टोरेस ज्वेलर्स घोटाळा : सीईओला अटक; लोणावळ्यातील हॉटेलमधून घेतले ताब्यात

टोरेस ज्वेलर्सच्या १ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पोलिसांनी टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी प्लॅटिनम हर्नचा सीईओ तौसीफ रियाजला रविवारी अटक केली.
टोरेस ज्वेलर्स घोटाळा : सीईओला अटक; लोणावळ्यातील हॉटेलमधून घेतले ताब्यात
Published on

मुंबई : टोरेस ज्वेलर्सच्या १ हजार कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात पोलिसांनी टोरेस ज्वेलर्सची पालक कंपनी प्लॅटिनम हर्नचा सीईओ तौसीफ रियाजला रविवारी अटक केली. तौसीफ रियाजला न्यायालयासमोर हजर केले असता, ३ फेब्रुवारी पोलीस कोठडीत सुनावण्यात आली.

टोरेस ज्वेलर्सची मुख्य कंपनी प्लॅटिनम हर्न आहे. तौसीफ रियाज या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तौसीफ लोणावळ्यात लपून बसला होता. पोलिसांनी रविवारी एका हॉटेलमध्ये त्याला अटक केली.

आतापर्यंत ५ जणांना अटक

टोरेस ज्वेलर्सचा १००० कोटींचा घोटाळा आहे. पोलिसांनी तौसीफ रियाजसह आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. तौसीफ रियाजविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती.

या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. एकूण १२ आरोपी असून, त्यापैकी ८ लोक फरार झाले आहेत. यात ७ जण युक्रेनचे आहेत, तर एका भारतीय व्यक्तीचा समावेश आहे. ३० डिसेंबर २०२४ पूर्वीच हे लोक देशातून फरार झाले आहेत.

या घोटाळ्याचा तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहेत. त्याचबरोबर सक्तवसुली संचालनालयानेही तपास सुरू केला आहे.

हे प्रकरण मनी लॉड्रिंग आणि संशयास्पद व्यवहाराशी संबंधित आहे. ईडीला तसे पुरावेही हाती लागले आहेत. आतापर्यंत ईडीने मुंबई आणि जयपूरसह दहा ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in