
मुंबई : टोरेस आर्थिक घोटाळ्याप्रकरणी युक्रेनियन अभिनेता अर्मेन अटेनलला आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने सोमवार ३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत अटक झालेला अर्मेन हा सहावा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यांत पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यापैकी चारजण न्यायालयीन कोठडीत आहे.
गेल्या महिन्यांत टोरेस घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच संचालक अजय सुर्वे, महाव्यवस्थापक तानिया कसातोवा आणि स्टोअर इंचार्ज व्हेलेंटिना कुमार या तिघांना पोलिसांनी अटक केली होती. याच गुन्ह्यांचा तपास सध्या आर्थिक गुन्हे शाखेकडे आहे. हा तपास हाती येताच या पथकाने गिरगाव येथून हवाला ऑपरेटर अल्पेश शहा ऊर्फ खारा आणि पुण्यातून सीईओ तौफिक रियाज ऊर्फ जॉन कारटर या दोघांना अटक केली होती. त्यापैकी तौफिक वगळता इतर चारही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
युक्रेनियन अभिनेता अर्मेन अटेल हा मालवणीतील मढ परिसरात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर त्याला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. अर्मेन हा युक्रेनियन नागरिक असून अभिनेता म्हणून परिचित आहे. त्याने हॉलीवूडच्या काही चित्रपटांत काम केले आहे. ही कंपनी वाढविण्यात तसेच आर्थिक व्यवहारात त्याचा महत्त्वाचा सहभाग होता. बोगस पॅनकार्ड मिळविण्याच्या प्रयत्नात त्याची तौसिफशी ओळख झाली होती. कंपनीच्या प्रत्येक बैठकीत त्याचा सहभाग होता. कंपनीचे सर्व आर्थिक व्यवहार सुरुवातीला त्याच्याकडे होते, मात्र नंतर त्याने कंपनीपासून स्वतला बाजूला केले होते. या संपूर्ण कटात त्याचा सहभाग उघडकीस आल्याने त्याच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.