
मुंबई : कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अटक केलेल्या टोरेस कंपनीतील तीन आरोपींच्या कोठडीत सत्र न्यायालयालयाने १८ जानेवारीपर्यंत वाढ केली.
फसवणूक करणाऱ्या युक्रेनियन नागरिकांचा शोध घ्यायचा असून आरोपींची सुटका करू नये, अशी विनंती राज्य सरकारने केली. याची दखल घेत सत्र न्यायाधीश एन. पी. मेहता यांनी आरोपींच्या कोठडीत वाढ केली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात टोरेस ज्वेलरी ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित तानिया क्साटोवा उर्फ ताझागुल क्साटोवा (५२), सर्वेश सुर्वे (३०) आणि व्हॅलेंटिना कुमार (४४) यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी अतिरिक्त सरकारी वकील जे. एन. सूर्यवंशी यांनी आरोपींच्या कोठडीत आणखी आठ दिवसांची वाढ करावी, अशी विनंती केली. आरोपींनी युक्रेनियन नागरिक असलेल्या इतर आरोपींशी कसा संवाद साधला याचा शोध घेतला जात आहे. त्यासाठी वेबसाइट आणि मोबाइलची तपासणी करणे आवश्यक असल्याने आरोपींची कोठडी वाढवण्याची मागणी करण्यात आली.