
मुंबई : ३१ वर्षांचे प्रदीपकुमार मामराज वैश्य खार परिसरात राहतात. त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. जून २०२४ ते ३० डिसेंबर २०२४ या कालावधीत त्यांनी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीनंतर त्यांना आठवड्याला सहा टक्के व्याजदर दिला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून कंपनीने व्याजदराची रक्कम देणे बंद केले होते. त्यामुळे ते दादर येथील कंपनीच्या कार्यालयात सोमवारी आले. यावेळी त्यांना कंपनीला टाळे असल्याचे दिसून आले.
वैश्य यांच्याप्रमाणेच इतर गुंतवणूकदारही सोमवारी दादर परिसरात जमा झाले. या गुंतवणूकदारांनाही गुंतवणुकीचे आमिष दाखविण्यात आले होते. सुरुवातीला सर्वांना परतावा दिल्यानंतर कंपनीने त्यांना परतावा देणे बंद केले होते. अशाप्रकारे कंपनीने जून ते डिसेंबर २०२४ या कालावधीत आतापर्यंत अनेकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करून त्यांची १३ कोटी ४८ लाख १५ हजाराची फसवणूक केली.
कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, मुख्याधिकारी तौफिक रियाज ऊर्फ जॉन कार्टर, महाव्यवस्थापक तानिया कॅसोतोवा आणि स्टोर इन्चार्ज व्हॅलेंटीना यांच्या सांगण्यावरून मोजोनाईट खड्यासाठी गुंतवणूक केली होती.
याप्रकरणी प्रदीपकुमार वैश्य यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कंपनीचे संचालक, मुख्याधिकारी, महाव्यवस्थापक आणि स्टोअर इंचार्ज अशा पाच जणांविरुद्ध गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केल्यावर त्यावर गुंतवणुकीवर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीच्या संचालकासह वरिष्ठ पदाधिकाऱ्याविरुद्ध शिवाजी पार्क पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
कंपनीचे दादर येथील जे. के सावंत मार्ग, टोरेस वस्तू सेंटर इमारतीमध्ये एक कार्यालय आहे.
कंपनी संचालक फरार
सर्वेश अशोक सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्को, तौफिक रियाज कार्टर, तानिया कॅसोतोवा आणि व्हॅलेंटीना कुमार अशी या पाच जणांची नावे आहेत. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच ते सर्वजण पळून गेले असून, त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्याचा तपास लवकरच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. मुंबईसह इतर ठिकाणी कंपनीची शाखा असून त्यात अडीच ते तीन लाख गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे.