
मुंबई : टोरेस इन्व्हेस्टमेंट घोटाळ्यात अटक करण्यात आलेला युक्रेनियन अभिनेता आर्मेन अतायिन याच्याकडे बनावट जन्म प्रमाणपत्र आढळले असून, त्याने स्वत:ला भारतीय नागरिक असल्याचा खोटा दावा केल्याचे मुंबई पोलिसांनी न्यायालयाला सांगितले आहे.
गेल्या आठवड्यात अटक करण्यात आलेल्या या अभिनेत्याला सोमवारी न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्याच्या पोलीस कोठडीचा कालावधी संपला होता. पोलिसांनी त्याच्या कोठडीच्या मुदतवाढीची मागणी केली नाही. परंतु गरज भासल्यास पुन्हा कोठडीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले.
चौकशीदरम्यान, अतायिन याने स्वत:ला भारतीय नागरिक असल्याचे सांगितले आणि त्याने जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर दस्तऐवज सादर केले, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड नोटमध्ये नमूद केले आहे.
"दस्तऐवजांची तपासणी केली असता, जन्म प्रमाणपत्राबाबत संशय निर्माण झाला, कारण ते बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एफ वॉर्डने जारी केल्याचे नमूद होते. त्यामुळे या प्रमाणपत्राची एफ वॉर्डमध्ये पडताळणी करण्यात आली असता, ते बनावट असल्याचे निष्पन्न झाले," असे पोलिसांनी सांगितले.
टोरेस ज्वेलरी ब्रँडची मालक प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर पोंझी आणि मल्टी-लेव्हल मार्केटिंग योजनांच्या आधारे कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.