मुंबई : बेसमेंट अधिक तळमजला व्ह्युइंग गॅलरी, टेरेस, काचेचा घुमट, कॅप्सूल लिफ्ट,पार्किंगची व्यवस्था अशा सोयीसुविधांसह मुंबई महापालिका मुख्यालयासमोरील टाऊनहॉल जिमखान्याचा पुनर्विकास होणार आहे. या कामासाठी मे. डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल ४५ कोटी रुपये खर्च करणार येणार आहे. आज (शुक्रवार) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रस्तावावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार वादविवाद होण्याची शक्यता आहे.
महापालिकेच्या जिमखान्याची क्रीडाभवन इमारत ही जीर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे या जिमखान्याचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या पुनर्विकासात नवीन टाऊन हॉल जिमखाना उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी नव्याने पुनर्विकास करताना टाऊन हॉल सोबतच मुंबईत भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी व्ह्युइंग गॅलरी, काचेचा घुमट, कॅप्सूल लिफ्ट, छतावरील कॅफेटेरिया इत्यादी बाबी प्रकल्पामध्ये समाविष्ट केल्या आहेत. पुरातन वारसा जतन परिसराचे महत्व लक्षात घेऊन आणि आजुबाजूच्या वारसा वास्तूंशी सुसंगत राहण्यासाठी महापालिका आर्किटेक्टने
एक कमी उंचीची इमारत (जास्तीत जास्त २८ मीटर) प्रस्तावित केली आहे. तसेच महापालिका वास्तुविशारद विभागामार्फत टाऊनहॉलच्या संकल्पनेसह आराखडे तयार करण्यात आले आहेत.
या कामासाठी पाच कंत्राटदारांनी टेंडर प्रक्रियेत सहभाग घेतला. मात्र मे. डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंत्राटदाराने सर्वात कमी म्हणजे २९.३० कोटी रुपयांत काम करण्याची तयारी दर्शवली.
खर्च कसा वाढला?
वास्तविक, मुंबई महापालिकेने सदर कामासाठी ३३.६६ कोटी रुपये खर्चाचा अंदाज वर्तवला होता. मात्र, तो सुमारे ११ कोटींनी वाढण्याची शक्यता आहे. १८ टक्के जीएसटी, ४ टक्के म्हणजे १.३८ कोटी रुपये भौतिक सादिलवार, ८ टक्के पाणीपट्टी आकार म्हणजे २.८७ कोटी रुपये, ४ टक्के मलनिःसारण आकार म्हणजे १.४३ कोटी रुपये, १० टक्के पर्यवेक्षण आकार ३.५९ कोटी रुपये आणि उपयोगिता सेवा हलविणे यासाठी १ कोटी रुपये अशा रकमा त्यात वाढणार आहेत. त्यामुळे हे कंत्राट खर्च ४४ कोटी ८७ लाख रुपयांच्या घरात जाणार आहे.