
मुंबई - मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून याठिकाणी विविध वैशिष्ट्यांनी नटलेली 'टाऊनहॉल जिमखाना' वास्तू उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय या वास्तू न्याहाळण्यासाठी काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने मुख्यालयासमोर सेल्फी पॉइंट देखील उभारला आहे. परंतु, पुरातन वारसा असलेल्या इमारती व संपूर्ण परिसर जवळून तसेच विहंगम स्वरूपात न्याहाळण्यासाठी अतिरिक्त सुविधा नव्हती. ही कमतरता महानगरपालिकेने 'टाऊनहॉल जिमखाना' वास्तू रूपाने भरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या संकल्पनेनुसार व निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीसमोर असलेल्या महानगरपालिका क्रीडाभवन जागेचा पुनर्विकास करून 'टाऊनहॉल जिमखाना' ही इमारत बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याची निविदा प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. एकूणच, ही टाऊनहॉल इमारत मुंबईकर व पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे.
असा असेल टाऊनहॉल जिमखाना
‘टाऊनहॉल जिमखाना' इमारतीमध्ये काचेचा घुमट, तसेच व्हिविंग गॅलरी असेल. या गॅलरीपर्यंत जाण्यासाठी काचेच्या कॅप्सूल लिफ्ट असतील. त्याचप्रमाणे छतावर उपाहारगृह अर्थात रूफटॉप कॅफेटेरिया देखील नियोजित आहे. ही संपूर्ण इमारत तळ मजला अधिक पाच मजल्यांची असेल. ही वास्तू साकारताना सभोवतालच्या उच्च दर्जाच्या पुरातन वारसा (हेरिटेज) वास्तू लक्षात घेता, टाऊनहॉल इमारतीची उंची ही सभोवतालच्या पुरातन वारसा वास्तूंच्या उंचीइतकी समर्पक प्रस्तावित करण्यात आली आहे.
बांधकामाकरिता निविदा प्रक्रिया सुरू
या इमारतीच्या बांधकामाकरीता उपअभियंता (इमारत बांधकाम) (शहर) विभागामार्फत निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर इमारत उभारणीचे काम लवकरच सुरू होईल. एकूणच, ही टाऊनहॉल इमारत मुंबईकरांसह देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरणार आहे. एवढेच नव्हे, तर या वास्तूच्या रूपाने एका वैशिष्ट्यपूर्ण इमारतीची मुंबईच्या प्रसिद्ध स्थळांच्या यादीमध्ये भर पडणार आहे.