दागिने अपहारप्रकरणी व्यापाऱ्याला अटक; क्रेडिटवर घेतलेल्या ६७ लाखांचा मित्राकडून अपहार

क्रेडिटवर दिलेल्या सुमारे ६७ लाखांच्या दागिन्यांसह हिरे अपहारप्रकरणी फरार व्यापाऱ्याला एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली.
संग्रहित चित्र
संग्रहित चित्र
Published on

मुंबई : क्रेडिटवर दिलेल्या सुमारे ६७ लाखांच्या दागिन्यांसह हिरे अपहारप्रकरणी फरार व्यापाऱ्याला एल. टी. मार्ग पोलिसांनी अटक केली. श्रेयांश मदनलाल गोलेचा असे या व्यापाऱ्याचे नाव असून तो तक्रारदार व्यापाऱ्याचा महाविद्यालयीन मित्र आहे. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

श्रेयांशने अशाच प्रकारे इतर काही ज्वेलर व्यापाऱ्यांची फसवणूक केली आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. यातील तक्रारदार ज्वेलर व्यापारी असून त्यांचा धनजी स्ट्रिटमध्ये घाऊक हिरे आणि हिरेजडित दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. श्रेयांश हा त्यांचा कॉलेजचा मित्र असून तोदेखील याच व्यवसायाशी संबंधित आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षांपासून तो त्यांच्याकडून क्रेडिटवर हिरे आणि हिरेजडित दागिने घेत होता. वेळेवर पेमेंट करून त्याने त्यांचा विश्वास संपादन केला होता.

अशी केली फसवणूक :

चार वर्षांपूर्वी एक ग्राहक आला होता. त्याला हिऱ्यांसह हिरेजडित दागिन्यांची गरज होती. त्यामुळे त्याने तक्रारदाराकडून सुमारे ७२ लाखांचे दागिने घेतले होते. त्यापैकी त्याने सव्वापाच लाखांचे पेमेंट केले होते. मात्र उर्वरित पेमेंट त्याच्याकडून मिळाले नव्हते. याच दरम्यान, श्रेयांश हा एक ते दिड वर्ष अचानक गायब झाला होता. काही महिन्यांपूर्वी त्यांना त्याचा नवीन मोबाईल क्रमांक सापडला. त्यामुळे त्यांनी त्याला कॉल करून पैशांविषयी विचारणा केली होती. मात्र त्याच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी श्रेयांशविरुद्ध एल. टी. मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपी मित्राचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना श्रेयांश हा बोरिवलीतील नेन्सी कॉलनीत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर शनिवारी त्याला बोरिवली येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

logo
marathi.freepressjournal.in