मुंबईत ट्राफिक जाम; वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

प. द्रुतगती महामार्ग, लार्सन ॲण्ड टुब्रोचा उड्डाणपूल, विमानतळ रोड या भागात ट्राफिक जाम होते.
मुंबईत ट्राफिक जाम; वाहतूककोंडीमुळे नागरिक हैराण

बुधवारचा दिवस मुंबईकरांसाठी ‘ट्राफिक जाम’चा होता. द्रुतगती महामार्ग ते पूल व शहरातील उड्डाणपुलांवर वाहनांच्या रांगाच लागल्या होत्या. यात भरीला पाऊस व खड्डे त्यामुळे मुंबईकरांचा जीव मेटाकुटीला आला. या ट्राफिक जामला कंटाळलेले नागरिक गाडीत बसून वाहतूक पोलिसांच्या नावाने बोटे मोडत होते.

प. द्रुतगती महामार्ग, लार्सन ॲण्ड टुब्रोचा उड्डाणपूल, विमानतळ रोड या भागात ट्राफिक जाम होते. विशेष म्हणजे वाहतूककोंडी फोडायला वाहतूक पोलीस जागेवर नव्हते. वाहनांच्या रांगाच रांग लागलेल्या होत्या.

या भयानक वाहतूककोंडीचा अनुभव घेतलेल्या रूपाली शिंदे म्हणाल्या की, माझी गाडी ४५ मिनिटे ट्राफिकमध्ये अडकली होती. एरवी मी माझ्या घरातून ऑफिसला २० मिनिटात जाते. अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस दिसत नव्हते.

तर गोरेगावहून अंधेरीतील प. द्रुतगती महामार्गावरून जाणाऱ्या आणखी एका महिला प्रवासीने सांगितले की, दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास ट्राफिक जाम होता. प. द्रुतगती महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मी ५० मिनिटे ट्राफिकमध्ये अडकले होते.

हाजी अली, ताडदेव रस्त्यावरही ट्राफिकची हीच गत दिसत होती. केम्स कॉर्नर येथील ब्रीजवरील वाहतूक पोलिसांनी तांत्रिक कारणास्तव ४० मिनिटे बंद ठेवली होती. प्रवाशांनी ऑगस्ट क्रांती मैदान-हाजी अली-विल्सन कॉलेज, नाना चौक मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केली.

लार्सन ॲण्ड टुब्रो पुलावरही वाहने अडकली होती. मुंबईकरांनी मुंबई वाहतूक पोलिसांना मदतीचे आवाहन केले. या उड्डाणपुलाच्या खालील रस्त्यावरही ट्रािफक जाम होते.

दरम्यान, पवई येथील वाहतूक पोलिसांनी सांगितले की, उड्डाणपुलाच्या खाली वाहने ठेवली असल्याने वाहतूककोंडी झाली. तसेच अनेक वाहने ही चुकीच्या दिशेने येत होती. या परिस्थितीची दखल घेत आमचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वाहतूककोंडी फोडली. जोगेश्वरी-विक्रोळी जोड रस्त्यावर अर्धा दिवस वाहतूककोंडी होती. जोगेश्वरी ते पवईला जाताना एक ते दीड तास लागला. या मार्गावर मोठमोठे खड्डे असल्याने वाहतूककोंडी झाली, अशी प्रतिक्रिया वाहतूककोंडीला कंटाळलेल्या प्रवाशाने दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in