मुंबई : पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. रस्त्यांवर राडारोडा कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात पथक नियुक्त करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक डॉ. इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. दरम्यान, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचा राडारोडा रस्त्यावर टाकल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित विकासकाला काम बंद करण्याची नोटीस बजावण्यात येईल, असे ही पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
मुंबईत सुमारे ५ ठिकाणी विविध बांधकामे सुरू असून, बांधकामाच्या ठिकाणी हवा प्रदूषण होत असल्यास संबंधित विकासकावर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात पथक नियुक्त करण्याचे आदेश शुक्रवारी झालेल्या बैठकीत चहल यांनी संबंधित विभागाने दिले आहेत. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचा नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित विकासकाला काम बंद करण्याची नोटीस बजावण्याचा निर्णय पालिकेने घेतली आहे. तसेच प्रदूषण रोखण्यासाठी नियमावली आणखी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नोटीस बजावण्यासह काम बंदची कारवाई
मुंबईत बांधकामांमुळे उडणारी धूळ आणि राडारोड्यामुळे प्रदुषणामध्ये मोठी वाढ होत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारा राडारोडा रात्रीच्या वेळी मुंबईतील मोकळ्या जागा, रस्त्यांवर बेजबाबदारपणे फेकण्याचे प्रकार सर्रासपणे घडतात. यासाठी टास्क फोर्सच्या माध्यमातून दीर्घकालीन उपाययोजना आखल्या जात आहे. यामध्ये आता विशेष पथक ठेवून सर्व २४ वॉर्डमध्ये नजर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पालिका स्तरावर शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यानुसार आगामी काळात रस्त्यावर राडारोडा टाकताना आढळल्यास नोटीस बजावण्यासह काम बंद अशी कारवाई करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.