दहीहंडी उत्सवावेळी नियम मोडणाऱ्या ६, १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

कारवाईत विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक
दहीहंडी उत्सवावेळी नियम मोडणाऱ्या ६, १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई

राज्यभरात दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. हा उत्सव साजरा करतेवेळी वाहतूक नियमांना मात्र केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अशा वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या तब्ब्ल ६ हजार १४४ चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४ हजार ८०० हून अधिक जणांवर तर एका दुचाकीवर तिघे प्रवास करणाऱ्या जवळपास ५३१ दुचाकीस्वारांवर कारवाई केल्याची माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मागील २ महिन्यांपासून मुंबईसह अन्य शहरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांवर तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येत आहे. परंतु अद्याप याचे गांभीर्य अनेक चालकांना आलेले नाही. अशातच शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी राज्यातील कानाकोपऱ्यात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. कोरोनानंतर मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होण्याचे हे पहिलेच वर्ष. यावेळी अनेक सहाभागी गोविंदानी वाहतुकीचे नियम मोडीत काढले. कोणी हेल्मेट घातले नव्हते, कोणी दुचाकीवर तिघांना घेत प्रवास केला तर अनेकांनी विरुद्ध दिशेने वाहने चालवत सिग्नल तोडण्याचे धाडस देखील केले. मात्र वाहतूक पोलिसांनी यावर ठोस पावले उचलत नियम मोडणाऱ्या चालकांवर कारवाईचा बडगा उगारला. पश्चिम उपनगरात विनाहेल्मेट प्रवास करणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १६३१ दुचाकीस्वारांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. दक्षिण मुंबईत विरुद्ध दिशेने वाहने चालवणाऱ्या सर्वाधिक म्हणजे १८४ चालकांवर कारवाई केली, तर दक्षिण मुंबईत ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या २१९ जणांवर कारवाई करण्यात आली.

वाहतूक पोलिसांनी केलेली कारवाई

विरुद्ध दिशेने वाहने चालवणे - ५८१

विनाहेल्मेट दुचाकी चालवणे - ४८०९

ट्रिपल सीट दुचाकी चालवणे - ५३१

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी - २२३

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in