रेल्वे प्रवास ठरला वरदान, ६ महिन्यांत ६ नवजात बाळांचा जन्म

रेल्वे प्रवासात समाजासमोर वेगळा आदर्श वन रुपी क्लिनिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ठेवण्यात आला
रेल्वे प्रवास ठरला वरदान, ६ महिन्यांत ६ नवजात बाळांचा जन्म

रेल्वे प्रवास म्हटले की, घड्याळाच्या काट्याप्रमाणे प्रवास करणारे प्रवासी, रेल्वे गाड्यांमधील, स्थानकांवरील गर्दी डोळ्यासमोर उभी राहते. तर दुसऱ्या बाजूला रेल्वे बिघाडाचा घटनांनी त्रस्त प्रवासी आणि त्यांच्या गप्पा कानी ऐकू येतात. मात्र, या रोजच्या धकाधकीच्या दैनंदिन रेल्वे प्रवासात समाजासमोर वेगळा आदर्श वन रुपी क्लिनिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ठेवण्यात आला आहे.

बहुतांशवेळा उपनगरीय रेल्वे मार्गावर प्रवास करत असताना अचानकपणे महिला प्रवाशांना प्रसूती वेदना जाणवतात. अशाच महिलांसाठी देवदूतासारखे धावत तत्काळ त्या ठिकाणी पोहोचत कधी धावत्या रेल्वेमध्ये तर कधी स्थानकावर, कधी प्रतीक्षालयात तर कधी स्थानकांवरील क्लिनिकमध्ये या महिला प्रवाशांची प्रसूती वन रुपी क्लिनिककडून करण्यात आल्या आहेत. मागील ६ महिन्यांत विविध स्थानकांवर अथवा धावत्या रेल्वेत ६ प्रसूतीद्वारे गोंडस ६ नवजात बाळांचा जन्म झाला आहे.

जगात, देशात आणि राज्यात आजही कोरोनाचे वादळ शमलेले नाही. डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. कोरोना सारख्या संकटातही देवदूताप्रमाणे ते रुग्णांची सेवा करत आहेत. अशातच काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रवाशांच्या तत्काळ मदतीसाठी, उपचारासाठी रेल्वे स्थानकांवर ''वन रुपी क्लिनिक'' संकल्पना अमलात आणली गेली. याद्वारे अनेक प्रवाशांना अपघातातून तर विविध व्याधीतून जीवनदान देण्याचे काम तेथील डॉक्टर आणि इतर सहकाऱ्यांकडून करण्यात आले. तर दुसऱ्या बाजूला रेल्वे प्रवासावेळी अचानकपणे प्रसूती कळा जाणवणाऱ्या महिलांच्या हाकेला धावून जाणाऱ्या या क्लिनिकच्या कार्यरत डॉक्टर्स आणि नर्सेस यांचं कौतुक करावं तितकं कमीच.

मागील ६ महिन्यांत ठाणे, पनवेल, टिटवाळा स्थानकात तर काही प्रकरणात धावत्या रेल्वेत महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. दरम्यान, कधी महिलेची धावत्या रेल्वेत प्रसूती तर कधी कोणाच्या जखमांवर उपचार, कोणाला आलेल्या हृदयविकारावर तातडीचे उपचार करून प्राण वाचविले तर कधी फिट, चक्कर आणि किरकोळ आजारांवर तत्काळ उपचार केले. यांसारख्या विविध आरोग्याच्या समस्यांनी ग्रासलेल्या प्रतिदिन शेकडो प्रवाशांचे वन रुपी क्लिनिककडून उपचार करण्यात येत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in