मुंबई : मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सर्व विद्याशाखांमधील पदवी आणि पदव्युत्तरावरील अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली आहे. या शैक्षणिक वर्षापासून बिगर स्वायत्त महाविद्यालयांत पदवी स्तरावरील तीन आणि चार वर्षांच्या अभ्यासक्रमांना सुरुवात झाली आहे. या बदलाच्या अनुषंगाने विषय शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी विद्यापीठामार्फत विविध जिल्ह्यात कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. संबंधित अभ्यासमंडळाने तयार केलेल्या अभ्यासक्रमांप्रमाणे विविध सहा व्हर्टिकल्स, त्यांचे मूल्यांकन आणि परीक्षा याबाबत सर्व शिक्षकांना मार्दर्शन करून प्रशिक्षित करण्यात येत आहे.
मुंबई विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग-मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण केंद्राच्या (यूजीसी- एमएमटीटीसी) संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठाच्या विविध परिक्षेत्रात कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. २८ सप्टेंबरला साठे महाविद्यालयात विज्ञान विद्याशाखा, एम. एल. डहाणूकर महाविद्यालयात वाणिज्य विद्याशाखेसाठी प्रशिक्षण पार पडले. तर २७ सप्टेंबरला व्ही. एन. बेडेकर व्यवस्थापन संस्थेत वाणिज्य, जोशी बेडेकर महाविद्यालयात मानव्यविज्ञान विद्याशाखा, २८ सप्टेंबरला डीटीएसएस महाविद्यालयात मानव्यविज्ञान विद्याशाखेचे प्रशिक्षण पार पडले.
‘आणखी एका व्यक्तीचा सहभाग’
कार्यशाळेला कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्यासह, प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे, वाणिज्य व व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता प्रा. कविता लघाटे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. किशोरी भगत, प्रा. सुचित्रा नाईक, प्राचार्य डॉ. मुरलीधर कुऱ्हाडे यांच्यासह विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, समन्वयक यांच्यामार्फत मार्गदर्शन करण्यात येत आहे. परीक्षा व मूल्यमापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या परिणाम आधारित शिक्षण यावरही भर देण्यात येत आहे.