मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरुच

राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई महापालिकेतील बदली सत्रामुळे अधिकाऱ्यांमध्ये धास्ती असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे
मुंबई पालिकेतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरुच

राज्यात शिंदे गट व भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुंबई महापालिकेतील समीकरण बदले जात आहे. शिवसेनेशी जवळीक व आदित्य ठाकरे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांचे बदली सत्र सुरू असून शुक्रवारी परिमंडळ चारचे सहआयुक्त विजय बालमवार यांची बदली उपायुक्त (विशेष) पदावर केली आहे. तर त्या पदावर कार्यरत संजोग कबरे यांची बदली परिमंडळ चारच्या उपायुक्तपदी केली आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर मुंबई महापालिकेतील बदली सत्रामुळे अधिकाऱ्यांमध्ये धास्ती असून अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दोन आठवड्यांपूर्वी परिमंडळ दोनचे उपायुक्त हर्षल काळे यांची बदली उपायुक्त(मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण)पदी, तर या पदावरील रमाकांत बिरादर यांची बदली परिमंडळ दोनच्या उपायुक्तपदी करण्यात आली होती. परिमंडळ दोनच्या उपायुक्त यांच्याकडे मुंबईतील सार्वजनिक उत्सव मंडळांचा समन्वय असतो. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर काळे यांची बदली केल्याने प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली होती. काही अधिकाऱ्यांची तर एका महिन्यात दोन वेळा बदली करण्यात आली आहे. सहआयुक्त बालमवार यांची बदली सहआयुक्त (विशेष)पदी करण्यात आली आहे. त्यांच्याकडे समन्वय अधिकारी या पदांचा भार कायम ठेवण्यात आला आहे. शिवाय उपआयुक्त (मध्यवर्ती खरेदी खाते) नियोजन खात्याचे कामकाज, महिला व बालकल्याण आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व नियोजन, जिल्हा ही जबाबदारी असणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in