वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली पुणे महसूल विभागात अतिरिक्त विभागीय म्हणून झाली आहे.

प्रतिनिधी/मुंबई : राज्य सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार सहकार आणि पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांची बदली महसूल विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी करण्यात आली आहे. मिलिंद शंभरकर यांची नियुक्ती मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ (म्हाडा) या पदावर झाली. तर बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांची नियुक्ती उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, सिडको मुंबई या पदावर झाली आहे.

मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडे वित्त विभागाचा अतिरिक्त कार्यभार होता. आता सरकारने वित्त विभागाचे पूर्णवेळ अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून ओ. पी. गुप्ता यांची नियुक्ती केली आहे. संजय सेठी यांची मंत्रालयात परिवहन आणि बंदरे विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर परिवहन आणि बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटिया यांची सामान्य प्रशासन विभागात माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली झाली आहे. फलोत्पादन आणि औषधी वनस्पती महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी लहू माळी यांची नियुक्ती झाली आहे.

अकोला महापालिका आयुक्त कविता द्विवेदी यांची बदली पुणे महसूल विभागात अतिरिक्त विभागीय म्हणून झाली आहे. एम. जे. प्रदीप चंद्रन यांची नियुक्ती उद्योग विभागात अतिरिक्त विकास आयुक्त म्हणून झाली. प्रकल्प संचालक कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली पशुसंवर्धन आयुक्तपदी करण्यात आली आहे. पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर यांची बदली पुण्यात प्रकल्प संचालक म्हणून झाली आहे. नांदेडचे सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांची बदली मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी पुणे या पदावर झाली आहे. तर परभणीतील सहाय्यक जिल्हाधिकारी कवाली मेघना यांची बदली नांदेड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in