मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकाचा कायापालट ;आमदार निधीतून दीड कोटींचा खर्च

१९६४ साली बांधण्यात आलेले मुंबई-सेंट्रल हे बसस्थानक प्रामुख्याने गिरगाव, परळ, भायखळा या भागातील चाकरमान्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे बससथानक आहे
मुंबई सेंट्रल एसटी बसस्थानकाचा कायापालट
;आमदार निधीतून दीड कोटींचा खर्च

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानांतर्गत एसटी स्थानकातील डेपोंचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मुंबई सेंट्रल बसस्थानक परिसरात रंगरंगोटी, प्रवेशद्वाराजवळ उद्यान विकसित करणे अशी विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी आमदार निधीतून दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव तसेच एसटी महामंडळाचे वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकारी गिरीष देशमुख यांच्या हस्ते मंगळवारी मुंबई सेंट्रल एसटी डेपोचे नूतनीकरण व सौंदर्यीकरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

बसस्थानकाची रंगरंगोटी, प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण, संरक्षण भिंतींवर विविध चित्रांचे रेखाटन, प्रवेशद्वाराजवळ बागबगीचा विकसित करणे, संगणकीय आरक्षण केंद्राची दुरूस्ती व प्रवाशांसाठी बैठक व्यवस्था अशा विविध कामातून मुंबई सेंट्रल बसस्थानकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. या कामाद्वारे संपूर्ण कायापालट झालेले सुशोभित बसस्थानक नवीन वर्षात प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध होईल, अशी ग्वाही या उद्घाटन प्रसंगी आमदार यामिनी जाधव यांनी दिली. यासाठी सुमारे दीड कोटी रुपये पेक्षा जास्त रक्कम जाधव यांच्या आमदार निधीतून जिल्हा विकास मंडळाच्या माध्यमातून खर्च करण्यात येणार आहे.

१९६४ साली बांधण्यात आलेले मुंबई-सेंट्रल हे बसस्थानक प्रामुख्याने गिरगाव, परळ, भायखळा या भागातील चाकरमान्यांसाठी अत्यंत उपयुक्त असे बससथानक आहे. कोकण, खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातून नोकरी-धंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांना गणपती उत्सव, होळी, दिवाळी, उन्हाळयाच्या सुट्टीसाठी आपापल्या गावी जाण्यासाठी मुंबई-सेंट्रल हे बसस्थानक जवळचे आहे. दररोज सुमारे १ हजार बसफेऱ्यांच्या माध्यमातून १० हजारपेक्षा जास्त प्रवाशांचा चढउतार या बसस्थानकातून होत असतो.

या कार्यक्रमाला एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, सिनेट सदस्य निखिल यशवंत जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते व सर्वसामान्य प्रवासी उपस्थित होते.

logo
marathi.freepressjournal.in