मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणी कपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड

मुंबई शहर, उपनगरांसह भिवंडी आणि ठाणे महापालिका हद्दीदरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवारी रात्री उशिराने बिघाड झाला.
मुंबईसह ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणी कपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड
Published on

मुंबई : मुंबई शहर, उपनगरांसह भिवंडी आणि ठाणे महापालिका हद्दीदरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील विद्युत उपकेंद्रातील ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवारी रात्री उशिराने बिघाड झाला. त्यामुळे या केंद्रातील ६ उदंचन पंप बंद पडले आहेत. त्याचा परिणाम पाणीपुरवठ्यावर झाला आहे. त्यामुळे पालिका जल अभियंता खात्याच्या अभियंत्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर पंप दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, पंप दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत मुंबई, ठाणे, भिवंडीत १५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईला दररोज ३,९४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यापैकी २,२०० दशलक्ष लिटर पाणी हे पिसे बंधारा येथून पंपाद्वारे उचलून ते पुढे जल शुद्धीकरण केंद्रात जलवाहिनीद्वारे पाठविण्यात येते. तेथे पाणी शुद्ध करून पुढे येवई या मोठ्या पाण्याच्या टाकीत ते साठवले जाते. तेथून ते पाणी पुढे मुंबईला मोठ्या जलवाहिनीद्वारे पुरवले जाते.

काय झाले ?

पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मर क्रमांक १ च्या बी फेज करंट ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवारी रात्री १ वाजता बिघाड झाला. त्यामुळे पिसे उदंचन केंद्र येथील एकूण कार्यरत २० पंपांपैकी ६ उदंचन पंप बंद झाले. पिसे येथील पिसे विद्युत उपकेंद्राची मुंबईच्या पाणीपुरवठा यंत्रणेत महत्त्वाची भूमिका आहे.

दुरुस्तीचे काम सुरू

पिसे विद्युत उपकेंद्राच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. हे दुरुस्ती काम शनिवारी व रविवारीही सुरू राहणार आहे. या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे शनिवार व रविवार असे दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरांसह मुंबई महापालिकेतर्फे ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात करण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in