
मुंबई : मुंबईमध्ये वायू प्रदूषणामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबईकरांचे जीवनमान सुकर ठेवण्यासाठी वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असतानाच मुंबईच्या वायू प्रदूषणात वाहतूक आणि बांधकामामुळे ५० टक्के प्रदूषण होत आहे. यासाठी पालिका प्रशासनाने २,२०० खासगी बांधकामांना सूचना केल्या असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियंत्रण सचिव अविनाश ढाकणे यांनी दिली.
ढाकणे यांनी सांगितले की, वायू प्रदूषणाच्या बाबतीत आम्ही मुंबई महापालिकेपुरते मर्यादित नसून आम्ही सर्व महानगरपालिका क्षेत्राचा विचार करतो. मागच्या वर्षी वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या वतीने सुमोटो दाखल करण्यात आली होती. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सर्व ठिकाणी प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न सर्वांच्या सहकार्याने केले जात आहे. तसेच सर्वात जास्त प्रदूषण हे टोल नाक्यांवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तशा सूचना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला देण्यात आल्याची माहिती ढाकणे यांनी दिली.
नव्याने उभारल्या जाणाऱ्या वाणिज्यिक प्रकल्पांनादेखील वायू प्रदूषणाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहेत. ज्या विकासकांचे काम मोठ्या स्वरूपात सुरू आहे त्यांनीदेखील वायू प्रदुषण कमी करण्यासाठी सुचवण्यात आलेल्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. वायू प्रदूषणाला आळा बसण्यासाठी प्रशासन म्हणून आम्ही कमी पडणार नाही. नियमांचे पालन करणाऱ्या विकासकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणणार नाही, असेही ढाकणे म्हणाले.
...तर सरकारी प्रकल्पही बंद करणार
वायू प्रदूषणात भर घालणाऱ्या खासगी आणि सरकारी कामांमध्ये कोणाताही फरक केला जाणार नाही. जर सरकारी कामामुळे वायू प्रदूषण होत असेल तर ते काम बंद करण्याचे आदेश दिले जाणार आहेत. तसेच जोपर्यंत नियमाचे पालन केले जात नाही. तोपर्यंत त्यांना उपाययोजना राबवण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. तरीदेखील नियमाचे उल्लंघन केले गेले तर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले. पालिकेतर्फे मुंबई एअर ॲप तयार केले गेले आहे. यामध्ये नागरिक हवेची तक्रार नोंदवू शकतात. प्रदूषण अटोक्यात येत नाही तोवर खोदकामाला परवानगी पालिका देणार नसल्याचेही सांगितले.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई आणि शेजारील महानगर क्षेत्रातील सर्व रेडी मिक्स काँक्रीट (आरएमसी) प्रकल्पांना नोटिसा दिल्या असून प्रदूषण कमी करण्यासाठी १०० टक्के प्रकल्प क्षेत्र झाकण्यासाठी शेड उभारण्यास सांगितले आहे. मुंबई महानगर क्षेत्रात ५०० हून अधिक आरएमसी प्रकल्प असून ते बांधकामासाठी काँक्रीट पुरवतात.
- अविनाश ढाकणे, सचिव, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ