मुंबई : कोस्टल रोड प्रकल्पातील हाजी अली येथील आंतरबदलातील आर्म ८ ते वरळी येथील बिंदू माधव चौकपर्यंत उत्तरेकडील ३.५ किमीची चार लेनची मार्गिका उद्या गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत या लेनवरून प्रवास करता येणार असून शनिवार व रविवारी ही लेन वाहतुकीसाठी बंद असणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या या टप्प्याची बुधवारी पाहणी केली.
पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) यतीन दळवी, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी आदींसह अभियंते, अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.
मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘मुंबई किनारी रस्ता’ प्रकल्प मोलाची भूमिका बजावत आहे. प्रकल्पातील विविध टप्पे जसजसे पूर्ण होत आहेत, तसतसे ते वाहतुकीसाठी खुले करून दिले जात आहेत. त्यामुळे एकाच वेळी प्रकल्पाचे काम होत असताना वाहतुकीला देखील वेग मिळतो आहे. संपूर्ण किनारी रस्ता प्रकल्पापैकी ९१ टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. दरम्यान, ११ मार्च २०२४ रोजी दक्षिणेला प्रवासाची सुविधा देणारी बिंदूमाधव ठाकरे चौक (वरळी) ते मरीन ड्राईव्ह ही ९.२५ किलोमीटर लांबीची दक्षिण वाहिनी मार्गिका खुली करण्यात आली होती.
आता ११ जुलै, गुरुवारपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात येणाऱ्या सदर मार्गिका सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहतील. तसेच शनिवारी व रविवारी बंद राहतील.
असा करा प्रवास
आता हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंतचा उत्तर दिशेने जाणारा साधारण ३.५ कि.मी. मार्ग खुला केला जाईल. सदर मार्गिकेवरून फक्त सिलिंकला जाता येईल. वरळी व प्रभादेवी परिसरात जाण्यासाठी डॉ. अॅनी बेझंट मार्ग व खान अब्दुल गफार खान मार्ग या नेहमीच्या रस्त्यांचा वापर करावा लागेल. त्यामुळे मरिन ड्राईव्हपासून कोस्टल रोडवरून खान अब्दुल गफार खान मार्गाद्वारे फक्त सिलिंकला जाणे शक्य होणार आहे. तसेच लोटस जंक्शनवरून सिलिंकला जाण्याकरिता आंतरबदलातील एक मार्गिका (आर्म- ८) सुरू करण्यात येत आहे.
असे होतेय काम : कोस्टल रोड प्रकल्पात (दक्षिण) प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सी लिंकच्या वरळी टोकापर्यंत मार्ग बांधण्यात येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी प्रकल्पामधील पूर्ण झालेल्या कामाचे टप्प्याटप्प्याने लोकार्पण करण्यात येत आहे.
सोमवारी ते शुक्रवार वाहतूक खुली
शनिवार, रविवारी वाहतूक बंद
पाच दिवस सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत कोस्टल रोडची सफर
मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा