मढ बेटावर अडकलेल्या कासवाच्या फुफ्फुस संसर्गावर उपचार सुरू

लॉगरहेड कासव जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय समुद्रकिनारी दिसत आहे. लॉगरहेड भारतात घरटे बांधत नाहीत.
मढ बेटावर अडकलेल्या कासवाच्या फुफ्फुस संसर्गावर उपचार सुरू

बुधवारी १७ ऑगस्ट रोजी मढ बेटाच्या किनाऱ्यावर एक कासव अडकलेले आढळून आले. सुमारे १४० किलोग्रॅमचे दुर्मिळ दिसणारे हार्ड-शेल्ड लॉगरहेड जातीचे हे कासव आहे. दोन दिवसांपूर्वी किनाऱ्याच्या जवळपास हे कासव तरंगत असल्याचे निदर्शनास आले. स्थानिकांनी या कासवाला पाहताच वनविभागाला कळवले. यानंतर मढ बेटावर दिसलेल्याला या दुर्मिळ कासवाला वनविभागाने वाचवत पुढील उपचारासाठी ऐरोली येथील कासव संक्रमण केंद्रात नेले. सध्या या कासवाच्या फुफ्फुस संसर्गावर उपचार सुरु असल्याचे सागरी जीवशास्त्रज्ञ आणि बचावकर्ते हर्षल कर्वे यांनी सांगितले.

लॉगरहेड कासव जवळपास सात वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय समुद्रकिनारी दिसत आहे. लॉगरहेड भारतात घरटे बांधत नाहीत. या प्रजाती शेवटच्या वेळी २०१७ मध्ये डहाणू आणि केळवा समुद्रकिनारी दिसल्या होत्या. मात्र अलीकडे आठवड्याभरात मुंबईच्या किनार्‍यावर हे दुर्मिळ कासव अनेकवेळेस निदर्शनास आले आहेत. पाच लाँगहेड्स आढळून आले असून त्यापैकी दोन रायगडमध्ये सापडले आणि स्थानिकांनी त्यांना पुन्हा समुद्रात सोडले. परंतु मढ बेटावर दिसलेल्याला वनविभागाने वाचवले आणि उपचारासाठी मॅंग्रोव्ह सेलने कासवाची वैद्यकीय स्थिती तपासण्यासाठी पशुवैद्यकाकडे नेले. कासव शेड्यूल १ प्रजाती असल्याने त्यांना वाचवताना एक विशेष मार्गदर्शक तत्त्वे पाळणे आवश्यक असतात. त्यानुसार आढळून आलेल्या या दुर्मिळ कासवाला केंद्रात नेण्याआधी त्याची पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे तपासणी करण्यात आली. यानंतर सल्ल्यानुसार या दुर्मिळ कासवाला पुढील उपचारासाठी ऐरोली येथील कासव संक्रमण केंद्रात नेण्यात आले आहे. सध्या या कासवाच्या फुफ्फुस संसर्गावर उपचार सुरु असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे.

कासव अडकून कसे पडले?

अलीकडे या प्रजाती मुंबईतील समुद्रात आढळून आल्या आहेत. मढ येथे आढळून आलेल्या या कासवाचे अडकून पडण्याचे एक कारण म्हणजे ते खराब फुफ्फुसामुळे श्वास घेऊ शकत नव्हते. कासव समुद्रात डुंबू शकत नाहीत म्हणून ते तरंगत राहतात. हेच कासव तरंगत असताना स्थानिक मच्छीमारांच्या निदर्शनास आले. आणि त्यांनी वनविभागाशी संपर्क केला. यावेळी लॉगहेड कासवाच्या फ्लिपरवर जखमा असल्याचे देखील आढळून आले. सध्या याच जखमांवर आता काही प्रतिजैविक आणि पूरक औषधांनी उपचार सुरु आहेत. तसेच या कासवाचे क्ष-किरण घेण्यात आले. त्यानंतर कासवाला फुफ्फुसाचा तीव्र संसर्ग झाल्याचे निदान झाले असल्याचे पशुवैद्य डॉ. रिना देव यांनी सांगितले.

लॉगहेड कासवाविषयी -

हार्ड-शेल्ड लॉगहेड हे कासव लांब स्थलांतरित प्रजातीमध्ये मोडतात. अन्न शोधात भारतीय किनाऱ्यावर दिसत असल्याचे सागरी जीवशास्त्रज्ञकडून सांगण्यात येते. ही कासवे घरटे बांधण्यासाठी आणि खाण्यासाठी लांब पल्ल्याचा प्रवास करण्यासाठी ओळखली जातात.

यापूर्वी ऑलिव्ह रिडले आणि हिरव्या कासवांवर उपचार केले आहेत. मात्र या प्रजातींवर उपचार करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या आढळलेल्या कासवाला फुफ्फुसाच्या संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. यावरील उपचार सुरु असून दिवसातून दोनदा नेब्युलायझेशन द्यावे लागत आहे. तर त्याला कोळंबी आणि खेकडे खायला द्यावे लागत आहेत. हे कासव किमान दोन महिने केंद्रात असणे अपेक्षित आहे. कासव लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे जेणेकरून ते पुन्हा समुद्रात सोडता येईल.

- डॉ. रिना देव, पशुवैद्य

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in