‘अतिक्रमणमुक्त मुंबई’, पालिकेचे मिशन

‘अतिक्रमणमुक्त मुंबई’, पालिकेचे मिशन

बेकायदा बांधकामांवर समन्वयाने कारवाई करण्याचे संबंधित यंत्रणांना निर्देश

मुंबई : मुंबईच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतलेल्या मुंबई महापालिकेने आता ‘अतिक्रमणमुक्त मुंबई मिशन’ हाती घेतले आहे. मुंबईत विविध प्राधिकरण असून प्रत्येकाने समन्वय साधत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवावी, असे निर्देश मुंबईतील विविध यंत्रणांना दिल्याचे पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंग चहल यांनी सांगितले. तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान, पोलीस यंत्रणेने प्राधान्याने बंदोबस्‍त पुरवावा, असे निर्देश पोलीस यंत्रणेला दिल्याचेही चहल यांनी सांगितले. अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवलेली माहिती जतन करा कारण ती न्यायालयीन कामकाजात महत्त्वपूर्ण ठरते, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

विविध प्राधिकरणांच्‍या पातळीवर होणारी अतिक्रमण निर्मूलन कारवाई आदींची माहिती व सविस्‍तर तपशील योग्यरित्या जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तपास व न्यायालयीन कामकाजासाठी ही माहिती महत्त्वपूर्ण ठरते, असे नमूद करून चहल म्हणाले की, “मुंबई महानगरातील विविध शासकीय यंत्रणांच्‍या भूखंडांवर राडारोडा (डेब्रिज) टाकला जात असल्याने शहराचे विद्रूपीकरण होत आहे, त्यास आळा घालावा. महानगरपालिका आणि पोलीस यंत्रणेने विविध ठिकाणी सीसीटीव्‍ही बसवावेत, स्‍थानिक पोलीस प्रमुख आणि महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांनी प्राधान्‍याने लक्ष द्यावे,” असे निर्देश चहल यांनी यावेळी दिले.

उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार राज्य सरकारने गठित केलेल्‍या अतिक्रमण निर्मूलन (स्थायी) समितीची बैठक नुकतीच महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त चहल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी (अतिक्रमण निर्मूलन) तेजसिंग पवार, म्‍हाडाचे उपआयुक्‍त (अतिक्रमण निर्मूलन) एस. एम. कळंबे, विमानतळ प्राधिकरणाचे सहायक व्‍यवस्‍थापक (जमीन व्‍यवस्‍थापन) संजय पाटोळे, सहायक पोलीस आयुक्‍त (पोलीस आयुक्‍त कार्यालय) दौलत साहे, मिठागारे अधीक्षक ए. पी. मोहंती, महानगरपालिकेचे सहआयुक्‍त (महानगरपालिका आयुक्‍तांचे कार्यालय) चंद्रशेखर चोरे, उपआयुक्त (विशेष) संजोग कबरे, सहायक आयुक्‍त (अतिक्रमण निर्मूलन) मृदुला अंडे आदी अधिकारी उपस्थित होते.

या यंत्रणा करणार कारवाई

मुंबई महानगरपालिका, जिल्‍हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए), झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), म्‍हाडा, रेल्‍वे, पोर्ट ट्रस्‍ट, विमान प्राधिकरण, मिठागारे यांच्‍यासह विविध शासकीय यंत्रणा या कारवाईच्या कामात कार्यरत आहेत. शासकीय संस्‍थांच्‍या भूखंडांवरील अतिक्रमणे हटवण्यासंदर्भात सर्व संबंधित यंत्रणांनी प्रभावी कार्यवाही करणे आवश्यक आहे. तसेच, येणाऱ्या सणासुदीच्या कार्यकाळात पोलीस प्रशासनाशी योग्यरित्या समन्वय साधून निष्कासनाची कारवाई हाती घ्यावी, असे निर्देशही चहल यांनी सर्व संबंधितांना दिले.

तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करा!

अतिक्रमण निर्मूलनकामी प्रभावी ठरलेली बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडील आरईटीएमएस माहिती आणि तंत्रज्ञान प्रणालीचा वापर करण्‍यासाठी इतर शासकीय संस्‍थांनी देखील पुढाकार घ्‍यावा, असे आवाहनही आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले.

logo
marathi.freepressjournal.in