

मुंबई : राज्यातील आश्रमशाळेतील सुविधा आणि इतर मागण्यांवर आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर आदिवासी विद्यार्थी ठाम राहिल्याने मंगळवारी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात जोरदार झटापट झाली. अनपेक्षित पोलीस कारवाईमुळे ‘टिळक भवन’ला आखाड्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. काँग्रेसच्या कार्यालयात आसरा घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना चार-चार पोलिसांनी फरफटत नेत बसमध्ये बसवले आणि त्यांची रवानगी नाशिकला केली.
आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतिगृहांमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचे नाशिकमध्ये ५१ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून हे विद्यार्थी २८ सप्टेंबर रोजी नाशिकहून पायी लाँगमार्च करत मुंबईत दाखल झाले होते. पोलिसांनी या विद्यार्थ्यांना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली होती. मंगळवारी आंदोलक विद्यार्थ्यांनी प्रदेश काँग्रेसच्या मुख्यालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी कठोर कारवाई केली.
विद्यार्थ्यांना उचलून फरफटत टाकले बसमध्ये
टिळक भवनमध्ये घुसून पोलिसांनी या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. विद्यार्थ्यांनी पोलिसांना जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिसांनी एका-एका विद्यार्थ्याला उचलून फरफटत बसमध्ये टाकले. पोलिसांच्या या कारवाईने अनेक विद्यार्थ्यांचे कपडे फाटले, मोबाईल आणि चपला गहाळ झाल्या. अनेकांच्या बॅगा आणि कपडे टिळक भवनमध्येच राहिले. सुमारे ४०० विद्यार्थी-विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांच्या या दडपशाहीचा फटका बसला.
कारवाईविरोधात तीव्र संताप
यावेळी विद्यार्थ्यांनी कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आदिवासी मंत्री अशोक उईके आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. मंगळवारी दुपारी साधारणपणे तासभर हा गोंधळ सुरू होता. यावेळी काँग्रेस नेत्यांनी पोलीस कारवाई विरोधात साथ न दिल्याने विद्यार्थ्यांचा प्रतिकार फारसा टिकला नाही. विद्यार्थ्यांना पोलिसांनी बखोटीला पकडून बसमध्ये टाकले. टिळक भवन परिसरात सुरू असलेला हा गोंधळ पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
आंदोलना विरोधात कठोर भूमिका
दूरवर असणाऱ्या मध्यवर्ती स्वयंपाकघरातून आश्रमशाळांना अन्न पुरवण्यात येते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा होते. त्यामुळे ही पद्धत बंद करावी, अशी या विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. मात्र ठेकेदारांच्या लाभासाठी राज्य सरकारला बदल नको आहे. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन सकल आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. मात्र या आंदोलनात काँग्रेसच्या एनएसयूआयचे पदाधिकारी असल्यामुळे सरकारने आंदोलनाच्या विरोधात कठोर भूमिका घेतली.
‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांनी आपले अभिनंदन केले आणि नाशिकमध्ये जल्लोषही केला. विद्यार्थ्यांचे प्रश्न खरे आणि शंभर टक्के रास्त आहेत. ते सोडविण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांना वेठीस धरून राजकारण केले जात असेल तर त्याला राजकीय पातळीवर उत्तर दिले जाईल’.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस