मुंबई : मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. अशा फोटोच्या आधारावर कोणाला इमेज खराब करता येत नाही. माझ्या कुटुंबाला या माध्यमातून जो त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तो चुकीचा आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत असताना मला सतत दौरे करावे लागतात. मी महिन्यातून फक्त एकदा घरी जातो. यावेळी माझ्या कुटुंबाने वेळ मागितला आणि तीन दिवस आम्ही हाँगकाँगला गेलो. तिथे कोणत्याही हॉटेलमध्ये गेले तरी कॅसिनो आहेच. त्याला क्रॉस करूनच तुमच्या रूममध्ये किंवा जेवायला जावे लागते. तिथेच कोणीतरी हा फोटो काढला आणि बदनामीचा प्रयत्न केल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊ येथील कॅसिनोमध्ये खेळतानाचा एक फोटो प्रसारित केला होता. माझ्याकडे असे अजून २७ फोटो आणि ५ व्हिडिओ असल्याचे सांगत राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती. बावनकुळे यांनी दीड तासातच साडेतीन कोटी रुपये जुगारावर उधळले असल्याचा आरोपही राऊत यांनी केला होता. त्यावर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोठा संघर्ष करून आम्ही इथपर्यंत पोहोचलो असल्याचे सांगून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘‘अशा कोणत्या फोटोच्या आधारावर कोणाची इमेज खराब करता येत नाही. माझ्या कुटुंबाला ज्या पद्धतीने त्रास द्यायचा प्रयत्न झाला, तो योग्य नाही. प्रदेशाध्यक्षपदाच्या व्यस्ततेमुळे मी महिन्यातून एकदाच घरी जातो. या प्रकरणात मला व्यक्तिगतरित्या बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. राजकीयदृष्टयाही बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परदेशात कोणालाही साडेतीन कोटी रुपये असेच नेता येत नाहीत. एक लाख रुपये नेत असाल तरी तीन तीन वेळा तपासणी होते. हाँगकाँगमध्ये माझा पैसा नाही. त्यामुळे इतके पैसे मी उधळण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना या पैशाचा पळवाटा माहिती आहेत त्यांनीच हे आरोप केल्याचेही बावनकुळे म्हणाले.
माणुसकी म्हणून एका फोटोवर थांबलो-संजय राऊत
एका फोटोवरून कोणाची इमेज खराब करू नये म्हणून बावनकुळे म्हणाले. पण, हेच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगावे. ते ज्या पद्धतीने इतरांवर हल्ला करतात, ते कोणत्या संस्कृतीत बसते, असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चाळीस-पंचेचाळीस वर्षे काम केले आहे. आता तुम्हाला कळले असेल की काय होते आणि काय घडते. तरी आमच्यात माणुसकी आहे म्हणून आम्ही एकाच फोटोवर थांबलो, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.