आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी

पुढील वर्षी नाशिकमध्ये होऊ घातलेल्या महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव म्हणून रुजू होण्यापूर्वीच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची विभागातून परत पाठवणी करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी
आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी
Published on

मुंबई : पुढील वर्षी नाशिकमध्ये होऊ घातलेल्या महाकुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव म्हणून रुजू होण्यापूर्वीच सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची विभागातून परत पाठवणी करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळातील काही वजनदार मंत्र्यांनी मुंढे यांच्या नियुक्तीला विरोध केल्याने त्यांना ‘नो एंट्री’ करण्यात आल्याची मंत्रालयात चर्चा आहे. मुंढे यांच्या जागी पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी लावण्यात आली आहे.

आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी
MUMBAI : तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांत २४ व्यांदा बदली

सामान्य प्रशासन विभागाने ३१ मार्च २०२६ रोजी १० ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यानुसार दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची बदली मंत्रालयात आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवपदी करण्यात आली होती. तर या विभागाच्या प्रधान सचिव विनिता वैद सिंघल यांना मृद आणि जलसंधारण विभागात पाठवण्यात आले होते. मात्र, याचदरम्यान मुंढे यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याने त्यांना आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या सचिवपदाची सूत्रे स्वीकारता आली नाहीत.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या आग्रहामुळे तुकाराम मुंढे यांची गेल्या २१ वर्षाच्या प्रशासकीय कारकिर्दीत २५ वेळा बदली झाली आहे. मुंढे यांच्यासारखे अधिकारी मंत्र्यांना नकोसे झाले आहेत. मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागातील बदली रोखण्यामागे काही मंत्र्यांचा हात असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाने विनिता वैद सिंघल यांच्या बदलीचे ३१ मार्च २०२६ चे आदेश रद्द केले आहेत. सिंघल यांची नियुक्ती पुन्हा आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. विभागाने ६ एप्रिल रोजी याबाबतचा आदेश जारी केला आहे.

दोन मंत्र्यांचा विरोध?

नाशिक महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने विभागाला प्राप्त होणारा शेकडो कोटींचा निधी आणि त्यामागील आर्थिक उलाढालीची किनार तुकाराम मुंढे यांच्या परत पाठवणीला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येते. कुंभमेळ्याच्या नियोजनात आपत्ती व्यवस्थापन विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे मुंढे यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळातील दोन ज्येष्ठ मंत्र्यांनी विरोध केला होता, असे समजते.

logo
marathi.freepressjournal.in