
मुंबई : मुंबईत नवरात्रोत्सवाची धूम आगळीवेगळी असली तरी चेंबूर येथील आई तुळजाभवानी मंदिर देवस्थानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. मतिमंद विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, गरीब गरजू रुग्णांना औषधे उपलब्ध करुन देणे असे विविध सामाजिक बांधिलकी जपत देवस्थानच्या वतीने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. मंदिराला सुमारे ५० वर्षे होत आले असून देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते, अशी माहिती तुळजाभवानी मंदिर देवस्थानचे वरिष्ठ पदाधिकारी काशीनाथ जानू विशे यांनी 'दैनिक नवशक्ति' बोलताना सांगितले.
नवरात्रोत्सव म्हटलं की ९ दिवस दांडिया नृत्य हेच चित्र डोळ्यासमोर येते. नवरात्रोत्सवात चनिया चोली असा पोषाख परिधान करत लहान-ग्यापासून मोठ्यांपर्यंत सगळेच दांडियाचा आनंद लुटतात. नवरात्रोत्सवाच्या ९ दिवसांत मुंबईत उत्साह जल्लोषात नाहून निघते. मात्र चेंबूर येथील आई तुळजाभवानी मंदिर देवस्थान आजही पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा करत आला आहे. आई तुळजाभवानी मंदिर देवस्थान हे ५० वर्षांपूर्वीचे मंदिर असून मंदिरात स्थापन देवीची मनोभावे पूजा अर्चा करण्यात येते.
आई तुळजाभवानी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. मात्र नवरात्रोत्सव गर्दी अधिकच होते. विशेष म्हणजे नवरात्रोत्सव दांडियाचे आयोजन न करता वृक्षलागवड, आरोग्य शिबिर असे उपक्रम राबविण्यात येतात, असेही त्यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात भूकंप झाला होता त्यावेळी देवस्थानच्या वतीने त्याठिकाणी मदतीचा हात पुढे केला होता. यंदाही मराठवाडा परभणी धाराशिव बीड आदी जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले असून पूरस्थिती ओढावली आहे. शेतपिकाचे नुकसान जीवितहानी झाली आहे. मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात देवस्थानच्या वतीने धनादेश सुपूर्द करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहापूर केतकी पाडा येथील गावातही देवस्थानच्या वतीने दिपावली फराळ, अर्पण साड्या फळं आदी साहित्यांचे वाटप करण्यात येते, असे ही काशीनाथ विषद यांनी सांगितले.