
पनवेल : ससा आणि कासवाच्या शर्यतीची गोष्ट सर्वांनाच माहिती आहे. पण आज प्रत्यक्षात जीवन-मरणाच्या शर्यतीत एका कासवाने पुन्हा यश मिळवले. वडाळे तलाव परिसरात गळ अडकलेल्या कासवाची जीवित सुटका करण्यात आली असून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
मुकुंद कोळी यांनी अग्निशमन विभागाला कळवले की एका कासवाच्या तोंडात गळ अडकले आहे. माहिती मिळताच अग्निशमनचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कासव अत्यवस्थ अवस्थेत आढळून आले. तत्काळ पनवेल महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाकडे त्याला सुपूर्त करण्यात आले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मधूलिका लाड व डॉ. भगवान गीते यांनी तातडीने उपचार सुरु केले. तालुका पशुसंवर्धन विभागाचे हेमंत तोडकर यांच्या मदतीने भूल देऊन कासवाच्या तोंडातील गळ यशस्वीरीत्या काढण्यात आले. तपासणीनंतर कोणतीही गंभीर इजा नसल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उपायुक्त प्रसेनजीत कारलेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर यांच्या उपस्थितीत कासवाला पुन्हा वडाळे तलावात सोडण्यात आले.
ही संपूर्ण कार्यवाही अग्निशमन विभागाच्या सतर्कतेमुळे आणि पशुवैद्यकीय विभागाच्या तत्परतेमुळे शक्य झाली. आयुक्त मंगेश चितळे यांनी दोन्ही विभागांचे कौतुक करत अभिनंदन केले.