दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन महागले, होम अप्लायन्सेसचा दरात ६ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ

व्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या होम अप्लायन्सेसना सणासुदीच्या काळात खरेदीला चांगली मागणी असते. त्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये गर्दी
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन महागले, होम अप्लायन्सेसचा दरात ६ ते ८ टक्क्यांपर्यंत वाढ

दिवाळी म्हंटले की दैनंदिन आवश्यक वस्तू तसेच इतर नव्या वस्तू खरेदींकडे नागरिकांचा कल असतो. अशातच विविध कंपन्या आपल्या वस्तूंमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती देत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात. टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारख्या होम अप्लायन्सेसना सणासुदीच्या काळात खरेदीला चांगली मागणी असते. त्यामुळे ग्राहकही मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये गर्दी करतात. मात्र, गेल्या वर्षभरात पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये लिटरमागे जवळपास 30 रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे सर्वच वस्तूंची इनपुट कॉस्ट वाढली आहे. परिणामी होम अप्लायन्सेससाठी ग्राहकांना यंदा ६ ते ८ टक्क्यांपर्यंत जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने यंदाच्या दिवाळीत सवलतींचे प्रमाण कमी असल्याचे पाहायला मिळत आहे.

निर्बंधमुक्त दिवाळीत चांगला व्यवसाय होणार अशी आशा विक्रेत्यांनी बाळगली होती. मात्र सद्यस्थितीत पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भिडणारे भाव यामुळे मालाची वाहतूक तसेच प्रत्येक वस्तूचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. दर दिवाळीत टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मिक्सर, ओव्हन आदी वस्तूंना जोरदार मागणी असते. यंदाही ग्राहकांची संख्या वाढत असली तरी सर्व वस्तूंच्या दरांत ६ ते ८ टक्क्यांची वाढ झाली आहे. यामध्ये गेल्या दिवाळीत १२ ते १५ हजारांपर्यंत असलेला फ्रीज यंदा २० ते २५ हजारांपर्यंत पोहचला आहे. तर १० ते १५ हजारांना मिळणारे वॉशिंग मशीन २० ते २२ हजारापर्यंत पोहचले आहे. तसेच १५ हजारापासून सुरू होणारे विविध स्मार्ट एलईडी ३५ ते ४० हजारांवर गेल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

स्थानिक विक्रेत्यांना ऑनलाइनचा फटका

ई कॉमर्स कंपन्यांनी यंदाच्या दिवाळीतही ऑफर्सचा वर्षाव केला आहे. या कंपन्या उत्पादकांकडून थेट माल खरेदी करून तो ग्राहकांना देत असल्यामुळे त्यांना वस्तू स्वस्त द्यायला परवडतात. परंतु, स्थानिक विक्रेत्यांपर्यंत माल येईपर्यंत स्टॉकिस्ट, डीलर, घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता अशी मोठी साखळी असते. या सर्वांचा नफा गृहीत धरता सदर वस्तू ऑनलाइनच्या किमतीत देणे अनेकांना परवडत नाही. याचाही व्यवसायावर परिणाम होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in