
मुंबई : चांगला परताव्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची सुमारे बारा लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अजय शर्मा या बोगस कंपनीच्या कर्मचार्याविरुद्ध माटुंगा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
झैनब अब्दुल हमीद सय्यद हे वडाळा येथे राहत असून ते रिलायन्स जिओमध्ये नोकरी करतात. त्यांचा मकरंद पाटील हा मित्र असून त्याने त्यांची ओळख अजय शर्माशी करुन दिली होती. अजय हा एका खाजगी कंपनीत कामाला असून या कंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे त्याने त्यांना सांगितले होते. ही सेबीद्वारे रजिस्ट्रर कंपनी असून कंपनीने आतापर्यंत अनेकांना चांगले रिटर्न मिळवून दिले आहे असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांनी तामिळनाडूच्या संबंधित कंपनीत गुंतवणुकीचा निर्णय घेऊन त्यात सुमारे बारा लाखांची गुंतवणुक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगले रिटर्न मिळत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे त्यांनी ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करण्यास सांगितली. मात्र कंपनीने ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केली नाही. याबाबत त्यांनी अजय शर्माकडे विचारणा केली असता तो विविध कारण सांगून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करीत होता. नंतर त्याने त्याचा मोबाईल बंद केला होता. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याची शहानिशा सुरु केली होती. यावेळी ही कंपनी बोगस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. तसेच अजयने पाठविलेले सेबीचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्रही बोगस होते. त्यामुळे त्यांनी अजय शर्माविरुद्ध माटुंगा पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या अजयचा शोध सुरु केला आहे.