
मुंबई : बिहारहून चरस आणून त्याची मुंबईत विक्री करणाऱ्या एका टोळीचा एमएचबी पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी दोन आरोपींना मुंबईसह बिहार येथून पोलिसांनी अटक केली आहे. दीपक अक्षय बरनाथ सिंह आणि असगरअली अमन हुसैन अन्सारी अशी या दोघांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी ५०० ग्रॅम वजनाचा चरसचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे साडेसात लाख रुपये असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. बोरिवली परिसरात काहीजण ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर एक्सर मेट्रो स्टेशनजवळील गॉसिप हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा लावून दीपक सिंह याला अटक केली. त्याच्याजवळ पोलिसांना ५०५ ग्रॅम वजनाचे चरस सापडले. त्याची किंमत ७ लाख ५७ हजार रुपये इतकी आहे. बिहारच्या छपरा गावात राहणाऱ्या असगरअलीने त्याला हे चरस दिले होते. ही माहिती प्राप्त होताच पथकाने बिहारहून असगरअली हुसैन याला अटक केली.