मुंबई : गणपती उत्सवासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातून अडीच लाखापेक्षा अधिक चाकरमानी गेल्या ५ दिवसांत एसटीने कोकणात रवाना झाले. ५ हजारांहून अधिक बसेद्वारे एसटी महामंडळाने या प्रवाशांची सुरक्षित वाहतूक करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.
३ ते ८ सप्टेंबर दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा संप, वाहतूककोंडी आणि त्यामुळे होणारा विलंब या अडचणीवर मात करत एसटी प्रशासनाने गेल्या अनेक वर्षांतील सर्व विक्रम मोडून काढले आहेत. महामंडळाने यंदा ५ हजार बसद्वारे २.५० पेक्षा अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली. यासाठी राज्यभरातील विविध आगारातून आलेले १० हजारांहून अधिक चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे अधिकारी यांनी विविध अडचणींना सामोरे जात वाहतूक पार पाडली. याबद्दल महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
१२ ते १७ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या परतीच्या वाहतुकीसाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या विभागातील आगारातून गट आरक्षण व व्यक्तिगत आरक्षणासाठी एसटी महामंडळाला प्रतिसाद मिळत आहे. गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून ३ ते ८ सप्टेंबर या काळात एसटीची वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत होते. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकेदेखील तैनात करण्यात आली होती. नादुरुस्त बसना पर्याय म्हणून चिपळूण, महाड व माणगाव आगारात १०० बस सज्ज होत्या.