मुंबई : विक्रोळीतील सेक्स रॅकेटप्रकरणी एका महिलेसह दोघांना विक्रोळी पोलिसांनी अटक केली. संगीता महाजन ऊर्फ नेहा आणि उदय शिवदास मार्शेलकर अशी या दोघांची नावे असून त्यांच्याविरुद्ध भादंवीसह पिटा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
संगीता ही विक्रोळी येथे राहत असून ती तिच्या राहत्या घरातून सेक्स रॅकेट चालवते. आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन ती महिलांना ग्राहकांसोबत वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करत असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी बोगस ग्राहकांच्या मदतीने संगीताला संपर्क साधून तिच्याकडे काही महिलांची मागणी केली होती. यावेळी तिने प्रत्येकी महिलेमागे दहा हजार रुपये घेत असल्याचे सांगून बोगस ग्राहकाला विक्रोळीतील एका फ्लॅटमध्ये बोलाविले होते. ठरल्याप्रमाणे बोगस ग्राहक विक्रोळीतील कन्नमवार नगर येथील इमारतीच्या फ्लॅटवर गेला असता, त्यांच्यात आर्थिक व्यवहार सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकला. घटनास्थळी संगीता आणि उदय या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. तेथे उपस्थित असलेल्या अन्य तीन महिलांना सुधारगृहात पाठविण्यात आले. याप्रकरणी महिला उपनिरीक्षक तेजश्री नरके यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संगीता महाजन आणि उदय मार्शेलकर यांच्याविरुद्ध भादवीसह पिटाच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता.