कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोन सहयोगी प्राध्यापक निलंबित

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये १२ ऑगस्ट रोजी एकाच रात्री १८ रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता.
कळवा रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी दोन सहयोगी प्राध्यापक निलंबित

ठाणे : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणात अखेर दोन सहयोगी प्राध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात चौकशी सुरू असताना समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने दोन प्राध्यापकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. डॉ. दीपा बंजन आणि डॉ. महेश मोरे अशी निलंबित करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे असून या प्रकरणाची विभागीय चौकशी सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये १२ ऑगस्ट रोजी एकाच रात्री १८ रुग्णाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली होती. याची गंभीर दखल घेऊन विरोधकांनी दोषींवर कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. सुरुवातीला कोणावरही या प्रकरणात ठपका ठेवला नव्हता, मात्र त्यानंतर आरोग्य विभागाच्या अहवालानुसार दोन्ही सहयोगी प्राध्यापक डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाहीत. तसेच त्यांनी आपल्या कर्तव्यात हलगर्जी केल्याबद्दल महापालिका प्रशासनाने या दोन्ही प्राध्यापकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या दोघांना आपला हलगर्जीपणा भोवला असून त्यांची विभागीय चौकशी सुरू राहील, असे महापालिकेने स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

यासंदर्भात भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी अधिवेशनात विधान परिषदेत हा प्रश्न उपस्थित केला होता. या रुग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली होती का, या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करणार का, अत्यवस्थ ९ ते १० रुग्ण अन्य रुग्णालयात हलविताना योग्य उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, असे अनेक प्रश्न त्यांनी विधानसभेत उपस्थित केले होते. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने उत्तर देताना यासंदर्भात दोन सहयोगी प्राध्यापकांवर कारवाई करणार असल्याची माहिती सभागृहात दिली होती. अखेर या दोन्ही सहयोगी प्राध्यापकांवर कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १३ ऑगस्ट रोजी एकाच दिवसात १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण राज्यात या घटनेमुळे खळबळ उडाली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यानंतर स्वतः रुग्णालयात जाऊन यासंदर्भात चौकशी समिती नेमण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दीड ते दोन महिने चौकशी समितीचा अहवाल समोर आला नव्हता. त्यानंतर आता दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in