
मुंबई : इमिग्रेशनसाठी वकिलाच्या फसवणुकीप्रकरणी एका महिलेसह दोघांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. आकाश दिनेश जानी आणि पंक्ती जैमीन पटल अशी या दोघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. व्यवसायाने वकिल असलेले २८ वर्षांचे तक्रारदार बोरिवली परिसरात राहत असून, त्याला एमबीएसाठी विदेशात जायची इच्छा होती. काही महिन्यांपूर्वी त्याची आकाश आणि पंक्ती यांच्यासोबत ओळख झाली होती. या दोघांनी त्यांना कॅनडा देशात पुढील शिक्षणासाठी इमिग्रेशन करुन देतो असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला होता.
इमिग्रेशनसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या दोघांनाही इमिग्रेशनसाठी त्याने ४ लाख १९ हजार रुपये दिले होते; मात्र दिलेल्या मुदतीत या दोघांनी त्याच्या इमिग्रेशनचे काम केले नाही किंवा इमिग्रेशन कामासाठी घेतलेले पैसेही परत केले नव्हते. त्यामुळे त्याने बोरिवलीतील स्थानिक न्यायालयात या दोघांविरुद्ध एक खासगी याचिका सादर करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी अशी विनंती केली होती. या याचिकेवर अलीकडेच सुनावणी पूर्ण झाली. यावेळी कोर्टाने कस्तुरबा मार्ग पोलिसांना दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास करण्याचे आदेश दिले होते.