डबेवाल्यांनाही लागले वारीचे वेध! बुधवार-गुरुवारी सेवा बंद; दोन दिवस सुट्टी

संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्या आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आस मुंबईच्या डबेवाल्यांना लागली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होऊ लागल्या आहेत. वारीत सहभागी होण्यासाठी तसेच पंढरपुरात पांडुरंगाचे दर्शन घेण्याची आस मुंबईच्या डबेवाल्यांना लागली आहे. डबेवाला कामगार मुंबईत जरी काम करत असला तरी त्याची वारी कधी चुकली नाही. वारीला जाण्यासाठी डबेवाला कामगारांनी दोन दिवसांची रजा जाहीर केली आहे. त्यामुळे १७ व १८ जुलैला डबेसेवा बंद असणार आहे, अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनने अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली.

१६ जुलै रोजी दिवसभर डबेवाले काम करतील व रात्री वाहनाने पंढरपूरला रवाना होतील आणि बुधवारी एकादशीला शासकीय सुट्टी आहे, त्यादिवशी डबेवाले पांडुरंगाचे दर्शन घेतील. गुरुवार, १८ जुलैला द्वादशीचा उपवास पंढरपुरात सोडतील व ते मुंबईला रवाना होतील. १९ जुलैला डबेवाले नेहमीप्रमाणे कामावर हजर होतील. डबेवाल्यांची शेकडो वर्षांची वारीची परंपरा आहे. दरवर्षी तो सुट्टी घेऊन पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. त्यामुळे काही ग्राहकांची गैरसोय होणार आहे, त्याबद्दल मुंबई डबेवाला असोसिएशनतर्फे दिलगिरी व्यक्त करत असल्याचे तळेकर म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in