आदई धबधब्यावरून पडून दोघांचा मृत्यू

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.
आदई धबधब्यावरून पडून दोघांचा मृत्यू

मुंबई: पनवेलजवळच्या आदई धबधब्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या ३५ वर्षीय व्यक्तीचा तसेच त्याच्या सात वर्षांच्या भाच्याचा पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली आहे. सात जणांचे पथक आदई धबधब्यामागील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेले असता, एक उंच सुळका सर करताना या दोघांचा पडून मृत्यू झाला. खांदेश्वर पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

प्रदीप कामी (७ वर्षे) आणि पारस कामी (३५ वर्षे) अशी या दोघांची नावे असून ते पवनवेलमधील सुखपूरचे रहिवासी आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, हे सर्व जण आदई धबधब्यावर गेले होते. धबधब्यावरील मागच्या बाजूला असलेल्या डोंगरावर ते गेले होते. या ठिकाणी पोलिसांनी जाण्यास बंदी घातली असतानाही, डोंगर चढताना त्यापैकी दोघे जण पडून खोल दरीत कोसळले. गंभीर जखमा झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.

आदई धबधबा हा येथील स्थानिकांमध्ये तसेच पावसाळ्यात पिकनिकसाठी जाणाऱ्यांमध्ये प्रसिद्ध आहे. जोरदार पाऊस पडत असताना, येथील पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होते, त्यामुळे येथे पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका अधिक असतो. पावसाळ्याआधी पोलिसांनी या धबधब्यावर जाण्यास परवानगी नाकारली होती. पोलिसांची गस्त टाळण्यासाठी हे सात जण मागच्या बाजूने धबधब्यावर गेले होते. गेल्या शनिवारीही खारघर येथील १३ वर्षीय हर्ष पफ्पू गौतम याचा पांडवकडा धबधब्यावर बुडून मृत्यू झाला होता. गौतम आणि त्याचे मित्र डोंगरकड्यावर फिरायला गेले असताना, ते पांडवकडा धबधब्यावर पोहण्यासाठी उतरले. मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in