लालबाग ब्रिजवरील अपघातात दोघांचा मृत्यू

कागदपत्रांसह मोबाईलवरून त्यांची नावे ऋषिकेश सालकर आणि शैलेश सैद असल्याचे उघडकीस आले.
लालबाग ब्रिजवरील अपघातात दोघांचा मृत्यू

मुंबई : शनिवारी रात्री उशिरा लालबाग ब्रिजवर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ऋषिकेश रमेश सालकर आणि शैलेश दत्तात्रय सैद अशी या दोघांची नावे आहेत. या अपघाताला ऋषिकेश सालकर हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हा अपघात शनिवारी रात्री उशिरा अडीच वाजता लालबाग चौकीच्या समोरील ब्रिजवर भायखळ्याकडे जाणाऱ्या वाहिनीवर झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऋषिकेश आणि शैलेश हे दोघेही साकीनाका येथील मोहिली गाव, डोंगरे उसमान गावचे रहिवाशी आहेत. शनिवारी रात्री ते दोघेही लालबाग येथून भायखळाच्या दिशेने जात होते. ही बाइक लालबाग ब्रिजवरून जाताना ऋषिकेशने भरवेगात बाइक चालविण्याचा प्रयत्न करताना काही वाहनांना ओव्हरटेक केले होते. त्यात त्याचा बाइकवरील नियंत्रण सुटले आणि त्याच्या बाइकने संरक्षक भिंतीला जोरात धडक दिली. या अपघातात ते दोघेही जखमी झाले होते. अपघाताची माहिती कंट्रोल रूममधून मिळताच काळाचौकी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी दोघांनाही पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.

त्यांच्याकडील कागदपत्रांसह मोबाईलवरून त्यांची नावे ऋषिकेश सालकर आणि शैलेश सैद असल्याचे उघडकीस आले. प्राथमिक तपासात भरवेगात बाइक चालविताना ओव्हरटेक करणे त्यांच्या जीवावर बेतले होते. त्यामुळे सहाय्यक फौजदार सुधाकर रामचंद्र माने यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ऋषिकेशवर हलगजीपणाने बाइक चालवून स्वत:सह शैलेश सैद यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. शवविच्छेदन केल्यानंतर दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांना सोपविण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in