गिरगावात लागलेल्या आगीत दोन वृद्धांचा मृत्यू

गिरगाव चौपाटी येथील रांगणेकर रोड येथे ही गोमती भवन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर रात्री ९.३० वाजता आगीचा भडका उडाला.
गिरगावात लागलेल्या आगीत दोन वृद्धांचा मृत्यू

मुंबई : गिरगाव चौपाटी येथील ७० ते ८० वर्षें जुनी म्हाडाच्या उपकरप्राप्त गोमती भवन इमारतीला शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. काही वेळातच आग वाऱ्या सारखी पसरली आणि इमारतीत धुराचे लोण पसरले. आगीने रौद्ररूप धारण केल्याने तिसऱ्या मजल्यावर अडकलेले हिरेन शहा (६०) व नलीनी शहा (८२) या एकाच कुटुंबातील दोन वृद्धांचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. दरम्यान, मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत अडकलेल्या ९ रहिवाशांची सुखरुप सुटका केली.

गिरगाव चौपाटी येथील रांगणेकर रोड येथे ही गोमती भवन ही चार मजली इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर रात्री ९.३० वाजता आगीचा भडका उडाला. या ठिकाणच्या ज्वलनशील साहित्यामुळे ही आग भडकत गेली. यामुळे १० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाने ही आग लेव्हल - २ची जाहीर केली. आगीचा भडका यामुळे इमारतीत आगीचे धुराचे लोण पसरल्याने इमारतीच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर काही रहिवासी अडकले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवत अडकलेल्या ९ रहिवाशांची सुखरुप सुटका केली. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही; मात्र अग्निशमन दलाचे अधिकारी स्थानिक पोलीस व पालिकेच्या संबंधित विभागातील अधिकारी पुढील तपास करीत असल्याचे अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर यांनी सांगितले.

६ तासाने आगीवर नियंत्रण!

गोमती भवन या चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर शनिवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोघा वृद्धांचा मृत्यू झाला असून, दोघांचे शव जेजे रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या घटनेत तिसऱ्या व चौथ्या मजल्यावरील घरातील सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तब्बल सहा तासांनी रविवारी पहाटे ३.३० वाजता आगीवर नियंत्रण मिळवले.

logo
marathi.freepressjournal.in