काम करताना इमारतीवरुन पडून दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

या ठिकाणी सिमेंट बिममध्ये सिमेंट करण्याचे काम करताना देबाशिसहा हा कर्मचारी आठव्या मजल्यावरुन दुसर्‍या मजल्यावर पडला होता
काम करताना इमारतीवरुन पडून दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू ; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंंबई- काम करताना इमारतीच्या आठव्या आणि नवव्या मजल्यावरुन पडून दोन कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याची घटना अंधेरी व घाटकोपर परिसरात घडली. मृतांमध्ये भरत सिताराम राय आणि देवाशिस संजय रॉय या अनुक्रमे २३ व २२ वर्षांच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. याप्रकरणी अंधेरी अणि घाटकोपर पोलिसांनी मुकेश चौरसिया व इक्बाल पंजाबी या दोन कंत्राटदाराविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

भरत हा ऍण्टॉप हिल येथील शीव-कोळीवाडा परिसरात राहत असून मुकेश चौरसिया या कंत्राटदाराकडे कामाला होता. गेल्या काही दिवसांपासून तो घाटकोपर येथील भटवाडी, झेलम इमारतीमध्ये काम करत होता. बुधवारी सकाळी सव्वाअकरा वाजता तो नेहमीप्रमाणे इमारतीच्या नवव्या मजल्यावर काम करत होता. एसीचे बाहेर पडणार्‍या पाण्यासाठी त्याला झुल्यावरुन बसून पाईप बसविण्याचे काम देण्यात आले होते. यावेळी त्याचा तोल गेला आणि तो नवव्या मजल्यावरुन खाली पडला होता. जखमी झालेल्या भरतला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या अपघाताला मुकेश चौरसिया हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध नंतर घाटकोपर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविला होता. दुसरी घटना रविवारी १० डिसेंबरला रात्री नऊ वाजता अंधेरीतील नवीन नागरदास रोड, हेवन इमारतीमध्ये घडली. या ठिकाणी सिमेंट बिममध्ये सिमेंट करण्याचे काम करताना देबाशिसहा हा कर्मचारी आठव्या मजल्यावरुन दुसर्‍या मजल्यावर पडला होता. त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर अंधेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. कर्मचार्‍याच्या सुरक्षेसाठी कंत्राटदार इक्बाल पंजाबी याने कुठलीही विशेष काळजी घेतली नव्हती. त्यामुळे हा अपघात झाल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in