लैंगिक अत्याचारप्रकरणी तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना अटक; १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत तटरक्षक दलातील दोन कर्मचाऱ्यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत मुलगी दहावीत शिकत असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ती घरात एकटीच होती...
लैंगिक अत्याचारप्रकरणी तटरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांना अटक; १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

मुंबई : सामूहिक लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांत तटरक्षक दलातील दोन कर्मचाऱ्यांना पवई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांवर भादंविसह पोक्सोच्या विविध कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून, अटकेनंतर त्यांना विशेष सत्र न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा या दोघांवर आरोप असून, यातील एक आरोपी तिच्याच शेजारी राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पिडीत मुलगी दहावीत शिकत असून ती तिच्या कुटुंबीयांसोबत पवई परिसरात राहते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ती घरात एकटीच होती. यावेळी तिच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने तिला त्याच्या घरी बोलाविले होते. यावेळी त्याचा मित्र तिथे आधीच थांबला होता. घरी आल्यानंतर या दोघांनी तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केला होता. हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, नाहीतर परिणाम वाईट होईल, अशी या दोघांनी तिला धमकी दिली होती.

या घटनेनंतर तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. काही दिवसांपासून ती प्रचंड मानसिक नैराश्यात होती. त्यामुळे तिच्यावर नौदल रुग्णालयात उपचार सुरू होते. घडलेला प्रकार तिने तिच्या पालकांना सांगितला. यावेळी तिच्या पालकांना त्यांनी जिवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्यांनी तटरक्षक दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत दोन्ही आरोपीविरुद्ध चौकशीचे आदेश दिले होते. या आदेशानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी दोन्ही आरोपींची चौकशी करून त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता. या अहवालानंतरत्यांनी पिडीत मुलीच्या पालकांना पवई पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी घडलेला प्रकार पवई पोलिसांना सांगितला. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तटरक्षक दलाच्या दोन्ही आरोपीविरुद्ध सामूहिक लैंगिक अत्याचारासह जीवे मारण्याची धमकी देणे तसेच पोक्सोच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in