लुटमार करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्का

वांद्रे-खार परिसरात दोन्ही आरोपींची प्रचंड दहशत
लुटमार करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्का

मुंबई - घातक शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार करणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. कृष्णा शेखर शेट्टी आणि कल्पेश महेंद्र कंथारिया अशी या दोघांची नावे आहेत. कृष्णाची स्वतची टोळी असून त्याच्यासह त्याच्या सहकार्‍यांची वांद्रे व आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दशहत असल्याचे बोलले जाते. मे महिन्यांत कृष्णा व कल्पेशने एका व्यावसायिकाचा तीस हजाराचा मोबाईल खेचून पलायन केले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांत गुन्हा नोंद होताच पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. तपासात कृष्णाची वांद्रे परिसरात लुटमार करणारी टोळी असून त्याच्यासह त्याच्या सहकार्‍यांनी गेल्या दहा वर्षांत अनेक गुन्हे केले होते. या टोळीने वांद्रे, खार, निर्मलनगर, खेरवाडीसह आजूबाजूच्या परिसरात प्रचंड दशहत निर्माण केली होती. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही पोलिसांत तक्रार करत नव्हते. चोरीसह जबरी चोरी, शारीरिक दुखापत करणे, धमकी देणे अशा दहाहून अधिक गुन्ह्यांची त्यांच्यावर नोंद आहे. त्यांच्या वाढत्या कारवायाची गंभीर दखल घेत २२ जुलैला वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मराठे यांनी त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्याची शिफारस केली होती. वरिष्ठांकडून मंजुरी मिळाल्यानंतर या दोघांवर मोक्का कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यांचा तपास आता एसीपी शशिकांत माने यांचयावर सोपविण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in