स्लॅब, भिंत पडून दोन कामगारांचा मृत्यू; भाईंदरमधील घटना

भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये स्लॅब, भिंत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना
स्लॅब, भिंत पडून दोन कामगारांचा मृत्यू; भाईंदरमधील घटना

भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाण्याच्या समोर असलेल्या श्रीनाथ ज्योती बिल्डिंगमध्ये स्लॅब, भिंत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एका डॉक्टरने दोन सदनिका एकत्र करण्यासाठी बेकायदेशीरपणे भिंती तोडत असताना अधिकची भिंत तोडण्याचे काम सुरू असताना शौचालय व बाथरूमचा स्लॅब व भिंत पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर एक कामगार जखमी झाल्याची घटना घडली. याप्रकरणी डॉ. विनयकुमार त्रिपाठीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

भाईंदर पूर्वेला वेणू नगर येथे तळ अधिक पाच माजल्याची श्रीनाथ ज्योती इमारत असून, यात तळ मजल्यावर दोन सदनिका एकत्र करण्यासाठी मालक डॉ. त्रिपाठी यांनी त्यातील जोडलेल्या भिंती व बाथरूम पोर्चचा स्लॅब तोडून काढत असताना सदरील अपघाताची घटना घडली. या अपघातात स्लॅब व भिंत अंगावर पडल्याने हरीराम चौहान (५५) व मखनलाल यादव (२६) या दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर आकाश कुमार यादव हा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तर अनधिकृत बांधकाम व दुरुस्तीप्रकरणी डॉ. त्रिपाठी यांनी पालिकेची कोणतीही परवानगी घेतली नव्हती. तसेच सोसायटीनेही सदरील बेकायदा काम बंद करण्याची नोटीस त्यांना दिली होती. महापालिकेला सुट्टी असल्याचा फायदा घेऊन डॉ. त्रिपाठी यांनी भिंती तोडण्याचे काम सुरू केले होते. अपघातग्रस्त परिसराचा पालिका आयुक्त संजय काटकर व उपायुक्त रवी यांनीही आढावा घेतला, तर वरिष्ठांच्या आदेशानुसार, सहाय्यक आयुक्त जितेंद्र कांबळे यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा व अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी हे करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in