गोरेगावला उड्डाणपुलावरून कोसळून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

गोरेगाव पूर्व येथून पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून २० फूट खाली मोटारसायकल कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.
गोरेगावला उड्डाणपुलावरून कोसळून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : गोरेगाव पूर्व येथून पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरून २० फूट खाली मोटारसायकल कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे.

गोरेगाव पूर्व येथून पश्चिमेला जाणाऱ्या उड्डाणपुलावरील मार्गिकेवर हा अपघात झाला. वैभव गमरे (२८) आणि त्याचा मित्र आनंद इंगळे पहाटे साडेचारच्या सुमारास मोटारसायकलने या उड्डाणपुलावरून जात असताना हा अपघात घडला. अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांना गोरेगाव पश्चिम येथील एमडीएनएल जंक्शन येथे दोन तरुण जखमी अवस्थेत रस्त्यावर पडल्याचे कळवण्यात आले. गोरेगाव पोलीस मोबाईल व्हॅनसह घटनास्थळी दाखल झाले असता इंगळे व गमरे हे बेशुद्धावस्थेत आढळले. रुग्णवाहिका बोलावून तत्काळ त्यांना बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. तेथे पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दोघेही दुचाकीवरून कुठे गेले होते, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. तसेच दुचाकी कोणी चालवत होते तेही अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही, असे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in