
मुंबईतील अंधेरी येथील साकीनाका येथील दुकानाला लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. दोघेही हार्डवेअरच्या दुकानात कामगार होते. राकेश गुप्ता (वय २२ वर्षे) आणि गणेश देवासी अशी मृतांची नावे आहेत. आग लागली तेव्हा दुकानात अकरा कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले तर दोन कामगार अडकले. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून कुलिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे.
साकीनाका परिसरातील एका हार्डवेअरच्या दुकानाला आज पहाटे दोनच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत हार्डवेअरचे दुकान आणि शेजारील दुकान जळून खाक झाले. साकीनाका मेट्रो स्टेशनजवळ ही दुकाने होती. आग इतकी भीषण होती की आगीच्या ज्वाळा दूरवर दिसत होत्या. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अथक प्रयत्न करून साडेतीनच्या सुमारास आग आटोक्यात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आग भडकली. या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. यानंतर पुन्हा आग आटोक्यात आणण्यात आली असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे. लेव्हल 1 च्या आगीमुळे संपूर्ण साकीनाका परिसरात धुराचे लोट पसरले होते. मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-1 म्हणून घोषित केली आहे.