
एमडी ड्रग्ज तस्करीप्रकरणी दोन तरुणांना घाटकोपर युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. फिलिप्स जगदाळे आणि आयुब सय्यद अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी साडेअकरा लाखांचे ५८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला कोर्टाने २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शीव परिसरात काहीजण एमडी ड्रग्ज खरेदी-विक्रीसाठी येणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्यांना मिळाली आहे. या माहितीची शहानिशा करण्यासाठी प्रभारी पोलीस निरीक्षक लता सुतार यांच्या पथकाने शीव येथील मिडास टॉवर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. रात्री पाऊणच्या सुमारास तिथे फिलिप्स आणि आयुब हे दोघेही आले होते. यावेळी या दोघांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना ५८ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. त्याची किंमत ११ लाख ६० हजार रुपये इतकी होती.