
देशात सर्वात मोठे अग्निशमन दल म्हणून ओळखल्या जाणारे अग्निशमन दल आणखी भक्कम करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. यातच अत्याधुनिक वाहने आणण्यासोबत मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात दोन नवीन फायर रोबोंची भर पडणार आहे. या दोन रोबोची किंमत पावणेतीन कोटी रुपये असून सप्टेंबर अखेर अग्निशमन दलाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
शहराप्रमाणेच पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये आगीच्या गंभीर घटना वाढू लागल्या आहेत. त्यामुळे अग्निशमन दलदेखील अधिक सक्षम करण्यावर पालिकेकडून भर देण्यात येत आहे. यात अत्याधुनिक वाहने आणण्यात आली असून २०१९ मध्ये पहिला फायर रोबोदेखील अग्निशमन दलात दाखल करण्यात आला. त्या वेळी त्यासाठी या रोबोवर ९८ लाख रुपयांचा खर्च झाला होता. २०१९रोजी रोबो दाखल झाल्यानंतर अग्निशमन दलात जादा धूर असलेल्या ठिकाणी जवानांना पोहोचणे शक्य नाही, अशा ठिकाणी या रोबोला पाठविण्यात येत असल्याने अडचणी कमी झाल्या. तीन वर्षांपासून हा रोबो अग्निशमन दलात कार्यरत आहे.