भूजमधून दोन्ही शूटरना अटक; सलमानच्या घरावर गोळीबार

दोन दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन शूटरना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भूज येथून अटक केली...
भूजमधून दोन्ही शूटरना अटक; सलमानच्या घरावर गोळीबार

मुंबई : दोन दिवसांपूर्वी बॉलीवूड अभिनेता सलमान खान याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटजवळ झालेल्या गोळीबारप्रकरणी दोन शूटरना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी भूज येथून अटक केली. विकीकुमार साहेबसाह गुप्ता आणि सागरकुमार जोगीउडर पाल अशी या दोघांची नावे असून ते दोघेही बिहारच्या चंपारणचे रहिवासी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही किल्ला न्यायालयाने २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या अटकेने अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

या गुन्ह्यांच्या तपासकामी गुन्हे शाखेचे पथक बिहार, गुजरात आणि इतर राज्यात जाणार असल्याचे सांगण्यात आले. सहपोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी मंगळवारी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन सोमवारी रात्री उशिरा गुजरातच्या भूज शहरातून विकीकुमार आणि सागरकुमार या दोन्ही शूटरना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या दोघांनाही पुढील चौकशीसाठी मुंबईत आणण्यात आले होते. आतापर्यंतच्या तपासात ते दोघेही सलमान खान याच्या घराजवळ आले. यावेळी विकीकुमार बाईक चालवत होता, तर सागरकुमारने गोळीबार केला. या गुन्ह्यांत लॉरेन्स बिष्णोईचे नाव समोर आले. त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. गोळीबारासाठी विदेशी पिस्तूलचा वापर झाला होता. मात्र, गोळीबारानंतर त्यांनी ते पिस्तूल फेकून दिले. त्यामुळे ते पिस्तूल लवकरच जप्त केले जाणार असून त्याच पिस्तूलने गोळीबार झाला होता का याची पाहणी केली जाईल.

दोन्ही आरोपी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला बिहारहून ट्रेनने मुंबई सेंट्रलला आले होते. २९ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान त्यांनी बॅण्डस्टॅण्डसह सलमान खानच्या घराची रेकी केली होती. त्यानंतर ते दोघेही मुंबईहून पनवेलला गेले होते. तिथे त्यांनी भाड्याने एक फ्लॅट घेतला होता. दहा मार्चला त्यांच्या फ्लॅटचा भाडेकरार झाला होता. त्यासाठी त्यांनी त्यांचे आधारकार्ड दिले होते. हा फ्लॅट पनवेलच्या एका व्यक्तीच्या मालकीचा असून त्याला त्यांनी १३ हजार ५०० रुपये दिले होते. १८ मार्चला ते दोघेही होळीसाठी बिहारला गेले आणि २८ मार्चला पुन्हा मुंबईत आले होते. २ एप्रिलला त्यांनी एक बाईक २४ हजार रुपयांमध्ये खरेदी केली. हा संपूर्ण व्यवहार कॅश स्वरुपात झाला होता. गोळीबारासाठी ते पुन्हा मुंबईत आले. सलमान खानच्या घराजवळ गोळीबार केल्यानंतर ते दोघेही माऊंट मेरीजवळ गेले. तिथे बाईक सोडून ते दोघेही वांद्रे, सांताक्रुझ आणि नंतर वाकोला येथे आले.

नवी मुंबईतून ते दोघेही एका खाजगी कारमधून सुरतला गेले होते. सुरत शहरात आल्यानंतर ते राज्य परिवहन बसने अहमदाबादला आणि नंतर भूज असा प्रवास त्यांनी केला होता. दुसऱ्या दिवशी ते भूज येथील एका मंदिरात थांबले होते. या दोघांची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे एक विशेष पथक भूज येथे गेले होते. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने या दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. सागर पाल हा दोन वर्षांपूर्वी हरयाणा येथे नोकरी करत होता. तिथेच तो बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला. विकीकुमार हादेखील तिथे कामाला होता. ते दोघेही एकाच गावचे रहिवासी असल्याने त्यांची चांगली मैत्री झाली होती. आतापर्यंतच्या चौकशीत त्यांना कोणालाही इजा घडवून आणायची नव्हती. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी त्यांनी गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. तसे आदेशच त्यांना देण्यात आले होते. अटकेनंतर या दोघांनाही मंगळवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने दोन्ही आरोपींना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

या दोघांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे आरोपीचे वकील अजय उमापती दुबे यांनी सांगितले की, कलम ३०७ या गुन्ह्यांत अजिबात लागू होत नाही. कारण कोणत्याही पीडित व्यक्तीला, तक्रारकर्त्याला कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. त्यांना या प्रकरणात खोटे गुंतविण्यात आले आहे. त्यांनी कधीही घटनास्थळाला भेट दिली नाही, असे त्यांनी सांगितले.

बिश्नोई गँगचा खात्मा करू - मुख्यमंत्री

मुंबईतील अंडरवर्ल्ड संपले आहे. आम्ही बिश्नोई गँगलाही संपवून टाकू. या मुंबईत कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी सलमान खानच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला. यानंतर बोलताना त्यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचा याप्रकरणी २४ तास तपास सुरू आहे. ही मुंबई आहे, इथे कुठलीही गँग नाही. पूर्ण अंडरवर्ल्ड संपले आहे. आम्ही बिश्नोईला खतम करू, असे शिंदे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in