चोरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड दोन महिलांना अटक

दोघींनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे
चोरीच्या गुन्ह्यांतील वॉण्टेड दोन महिलांना अटक

मुंबई : चोरीच्या दोन गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या दोन महिला नोकरांना जुहू आणि एमएचबी पोलिसांनी अटक केली. मारिया राजू नाईक ऊर्फ मारिया कल्को आणि कालिंदा नाना कसबे अशी या दोघींची नावे आहेत. या दोघींकडून पोलिसांनी चोरीचा काही मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कोठडीनंतर या दोघींनाही लोकल कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

जुहू येथील अझारा अख्तर जयपुरी यांच्या नातवाच्या देखभालीसाठी मारिया नाईक हिला केअरटेकर म्हणून ठेवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातून साडेसात लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. त्यांच्या घरी मारिया वगळता इतर कोणीही येत नव्हते. त्यामुळे तिनेच या दागिन्यांची चोरी केल्याचा संशय व्यक्त करून अझारा यांनी तिच्याविरुद्ध जुहू पोलिसांत तक्रार केली होती.

याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच मारियाला चार दिवसांपूर्वी गोरेगाव येथून पोलिसांनी अटक केली. दुसऱ्या घटनेत एका घरी मोलमजुरी करताना मंगळसूत्र नेऊन पोबारा केल्याप्रकरणी कालिंदा कसबे या महिलेस एमएचबी पोलिसांनी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in