मुंबई : शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक

दुर्घटनेप्रकरणी पालिकेने शौचालय चालवणाऱ्या ‘ओम दुर्गा सेवा सोसायटी’ या संस्थेला, आपल्यावर पोलीस कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस पाठवली असून याबाबत २४ तासांत खुलासा करण्यास सांगितले आहे.
मुंबई : शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये पडून दोघांचा मृत्यू; एकाची प्रकृती चिंताजनक
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई : मालवणी-मालाड अंबोजवाडी येथील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये तीन खासगी कामगार पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी पालिकेने शौचालय चालवणाऱ्या ‘ओम दुर्गा सेवा सोसायटी’ या संस्थेला कारणे दाखवा नोटीस पाठवल्याचे पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले.

मालाड पश्चिम अंबोज वाडी, अब्दुल हमीद रोड, मालवणी गेट नंबर ८, शिफा हार्डवेअर दुकानासमोरील सार्वजनिक शौचालयाच्या सेप्टिक टँकमध्ये तीन कामगार पडले. या दुर्घटनेत सुरज केवत (१८), विकास केवत (२०) या दोघांचा मृत्यू झाला, तर रामलगन केवत (४५) याची प्रकृती गंभीर असून त्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, हे शौचालय संस्थेला सीबीओअंतर्गत चालवण्यात देण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित शौचालयाची जबाबदारी सर्वस्वी संस्थेची आहे. दोन जणांचा मृत्यू होणे ही बाब गंभीर स्वरूपाची असून यातून निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे दिसून येते. त्यामुळे आपल्यावर पोलीस कारवाई का करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस पाठवून याबाबत २४ तासांत खुलासा करावा, असेही संस्थेला सांगण्यात आल्याचे दिघावकर यांनी सांगितले.

हे शौचालय मे. ओम दुर्गा सेवा सोसायटी या खासगी संस्थेला सीबीओअंतर्गत चालवण्यात देण्यात आले आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू होणे ही बाब अत्यंत गंभीर असून संस्थेचा निष्काळजीपणा असल्याचे यातून दिसून येत असल्याचे पालिकेच्या पी-उत्तर विभागाने पाठवलेल्या कारणे दाखवा नोटिसीमध्ये म्हटले आहे. या प्रकरणी आपल्यावर पोलीस कारवाई का करू नये याबाबत २४ तासांत खुलासा करावा, असे नोटिसीत नमूद करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in