दोन अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

दोन अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे

मुंबई : शहरात दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनेत दोन तरुणांचा मृत्यू झाला. साकिनाका आणि मुलुंड परिसरात दोन्ही अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. देवेश विजयकुमार पाटील आणि समिउल्लाह अमिरुल्लाह खान अशी अपघातातील मृत तरुणांची नावे नावे आहेत. याप्रकरणी नवघर आणि साकिनाका पोलिसांनी दोन स्वतंत्र अपघाताची नोंद करून मिक्सर चालक राजेशकुमार लालबहादूर यादव याला अटक केली. अटकेनंतर त्याची लोकल कोर्टाने जामिनावर सुटका केली आहे. २४ वर्षांचा देवेश हा भांडुप येथील टेंभीपाडा, सिद्धीविनायक सोसायटीमध्ये राहत होता. २९ जुलै रोजी त्याचा बाईकवरील नियंत्रण सुटून अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याच्यावर मुलुंडच्या सावरकर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला नंतर मुलुंडच्या फोर्टीज रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान गुरुवारी, १७ ऑगस्टला त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासात भरवेगात बाईक चालविण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला होता. या अपघाताला देवेश हाच जबाबदार असल्याने त्याच्याविरुद्ध मंगळवारी, २२ ऑगस्टला नवघर पोलिसांनी हलगर्जीपणाने बाईक चालवून स्वतच्याच मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

दुसरा अपघात शुक्रवारी, १८ ऑगस्टला रात्री दहा वाजता साकिनाका येथील साकीविहार रोड, पाल ऑटो स्टोरसमोरील साकिनाका जंक्शनजवळ झाला. समिउल्लाह हा शुक्रवारी रात्री दहा बाईकवरुन घरी जात होता. यावेळी त्याला भरवेगात जाणाऱ्या एका मिक्सरने धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अपघातानंतर मिक्सर चालक पळून गेला होता. याप्रकरणी साकिनाका पोलिसांत अपघाताची नोंद होताच पळून गेलेल्या मिक्सर चालक राजेशकुमार लालबहादूर यादव याला पोलिसांनी अटक केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in