
मुंबई : शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीला सर्वंच स्तरातून विरोध होत असून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघात शासन निर्णयाची होळी करण्यात आली. यावेळी महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे हिंदी भाषा सक्तीविरोधात ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे पक्ष एकत्र आले आहेत.
हिंदीच्या शासननिर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. हिंदी सक्तीच्या शासननिर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राज्यभर आंदोलन करत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ परिसरात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह काही मराठी कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले होते. मनसेचे नेते नितीन सरदेसाई यावेळी उपस्थित होते.
राज्य शासनाने राष्ट्रीय शिक्षण धोरण अंतर्गत बदल करून इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना हिंदी सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मुंबईत ५ जुलै रोजी मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र त्याआधी राज्यभरात तालुकास्तरावर हिंदी सक्तीच्या जीआरची होळी करत निषेध व्यक्त करण्यात आला.
शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी सक्तीला राज्यातील विविध राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. या विरोधात गेल्या काही दिवसांपासून ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. एवढ्या लहान वयात मुलांवर हिंदीचे ओझे
नको असे मत अनेक राजकीय नेतृत्वांनी मांडले. दरम्यान रविवारी ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. मुंबई मराठी पत्रकार संघात या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत हिंदी सक्तीच्या शासननिर्णयाची होळी करण्यात आली होती. यावेळी ठाकरे सेनेच्या नेत्यांसह मनसेच्या नेत्यांची उपस्थिती होती.
शिंदे सेनेचाही हिंदी सक्तीला विरोध
हिंदी भाषा सक्तीविरोधात मनसे, ठाकरेंच्या शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष एकवटले आहेत. त्यात आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनीही विरोध केल्याचे समजते. रविवारी सह्याद्री अतिथीगृहात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शिंदे सेनेने हिंदी भाषा सक्तीविरोधात नाराजी व्यक्त केल्याचे समजते. रविवारी सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिंदी भाषेचा मुद्दा चर्चेत आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सरकारच्या हिंदी भाषेच्या या निर्णयाला विरोध केला आहे. १ ली ते ४ थीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा शिकवण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. मात्र, हिंदी भाषा लादण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.